चिपळूण ः शहरालगतच्या कळबंस्ते येथील शासनाच्या पडीक जागेत वनस्पती उद्यान आणि देवराईची हिरवळ वाढत आहे. देवराई अदिक सुशोभीत होण्यासाठी येथे शहर परिसरातील विद्यार्थ्यांनी देवराईस भेट देत विविध वनस्पती व देवराईंच्या झाडांची माहिती घेतली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देवराईत वाढलेले गवत व कचरा काढून बुधवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवले.
येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत प्रशासकीय अधिकारी, विविध सेवाभावी संस्था, कंपन्या आणि सह्याद्री निसर्ग मित्र च्या माध्यमातून कळबंस्ते येथे देवराई आणि वनस्पती उद्यान विकसीत केले आहे. सुमारे दोनशे हून अधिक प्रजातीची दिड हजार झाडे येथे लावण्यात आली आहेत.
पावसाळ्यात लावलेली ही झाडे चांगलीच वाढू लागली आहे. जी रोपे मृत पावली तेथे नव्याने त्याच जातीची रोपे पुन्हा लावण्यात आली. काही रोपे जिल्ह्यात न मिळाल्याने ती पुण्यातून आणली. विद्यार्थ्याना या वनस्पतींच्या बोटॅनिकल बॅलची माहिती होण्यासाठी बुधवारी प्रांत कार्यालय व गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून डी. बी. जे महाविद्यालय, न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सती चिंचघरी, आर सी कॉलेज ज्युनियर कॉलेज पेढे, गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज चिपळूण, ख्रिस्त ज्योती स्कूल वालोपे, मेरी माता स्कूल खेर्डी या शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी भेट देऊन स्वच्छता अभियान उपक्रम राबविला.
या विद्यार्थ्यांना वनस्पती उद्यान व देवराई बाबत तसेच झाडांची निगा, त्यांचे फायदे व आयुर्वेदिय उपयोग तसेच ग्रामीण भागात वेगगवेगळया प्रजातींचे झाडांची निर्मिती करुन बोटॅनिकल गार्डन तयार करणे, मधमाशी/फुलपाखरु यांचे वसतीस्थान निर्माण करणे, पक्षांमार्फत १५ किमी अंतरामध्ये फळझाडे, फुलझाडे यांचे परागीकरण करणे, जैवविविधतेचे जतन करणे, याबाबत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी माहिती सांगून झाडांचे महत्व पटवून दिले.
यावेळी सर्वच मुलांनी देवराईमध्ये मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमात सहभागी झालेल्या शाळांना व मुलांना प्रांताधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले.












