चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील बामणोली नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी या मंडळाला पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य उपक्रम डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या वतीने मुंबई विलेपार्ले दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यातून मिळणाऱ्या निधीतून मंडळ अनेक उपक्रम साकारणार असल्याचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश चांदिवडे यांनी मानस व्यक्त केला आहे.
बामणोली गावातील नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी गेले अनेक वर्ष विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी आपला नावलौकिक वाढवला आहे. मंडळाच्या वतीने श्री जय हनुमान मंदिराचा उत्सव सुद्धा साजरा केला जातो. त्यावेळी सुद्धा अनेक कार्यक्रमाचे आयोजन मंडळ करत असते. शक्यतो सामाजिक उपक्रम राबवणे याकडे मंडळाचा कल असतो. सन २०२७ मध्ये या मंडळाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे आतापासूनच मंडळांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करून आर्थिक निधी उभा करण्यासाठी मंडळाने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोकणातील सुप्रसिद्ध कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज या प्रसिद्ध लोकनाट्य मंडळाचा प्रयोग विलेपार्ले दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित केला आहे. दिनांक ११ जानेवारी सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम सादर होणार आहे. यातून मिळणाऱ्या निधीतून नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य असे विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाला गावातील मुंबई स्थित आणि इतर सर्व कलाप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवजवान मित्र मंडळ किजबिले मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.












