मोफत मणक्याच्या तपासणी शिबिराचे आयोजन

 

 

२६ नोव्हेंबरला कणकवलीत स्पाइन तज्ज्ञांचा उपस्थिती

कणकवली : द स्पाइन फाउंडेशन, उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि डॉक्टर फायडे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात मोफत मणक्याची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 

या शिबिरात सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज स्वतः तपासणी करणार आहेत, अशी माहिती डॉ. विद्याधर तायशेटे आणि डॉ. सुहास पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

येथील भवानी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक करंबेळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. तायशेटे म्हणाले, १९९८ मध्ये डॉ. शेखर भोजराज यांनी स्पाइन फाउंडेशनची स्थापना केली. ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी मणक्याच्या विकारांवर परवडणारी व दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध करून देणे हे फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे.

 

फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत मणक्याच्या तपासणी शिबिरे, फिजिओथेरपी, नॉन-सर्जिकल उपचारपद्धती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोफत स्पाइन सर्जरी केली जाते. दुर्गम भागांपर्यंत मोबाईल फिजिओथेरपी युनिट्स, आदिवासी भागांत आरोग्य शिबिरे, तसेच अंबाजोगाई येथे जटिल स्पाइन सर्जरीसाठी मॉड्युलर ऑपरेटिंग थिएटर स्थापन केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

याशिवाय मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये स्पाइन आऊटरीच कॅम्प राबवून स्थानिकांना उपचार सेवा दिली जात आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या मोफत तपासणी शिबिराचा तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. तायशेटे आणि डॉ. पावसकर यांनी केले.

 

शिबिराविषयी अधिक माहितीसाठी डॉ. धनंजय रासम व रोशन कुळे यांच्याकडे संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.