▪️कट्टा येथे शेतकरी कार्यशाळेचे आयोजन.
▪️मालवण कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजन.
मसुरे | झुंजार पेडणेकर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 च्या खरीप हंगामापासून सत्यमेव जयते फार्मर कप या शेतकरी गटांच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा कालावधी 1 मे 2026 ते जानेवारी 27 असा असणार आहे. या स्पर्धेची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या वतीने तसेच पाणी फाउंडेशन च्या वतीने सुरू आहे. या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी शेतकरी कार्यशाळा ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा – मालवण येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली श्री उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी मालवण श्री अमोल करंदीकर, मालवण तालुका आत्मा शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष श्री प्रताप चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री हुसेन आबर्डेकर, श्री दशरथ सावंत, उमेद चे तालुका समन्वयक श्री कांबळी, माविम स्वाधार केंद्राच्या श्रीमती चौकेकर, यासह मालवण तालुक्यातील 150 उत्साही शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशन चे प्रशिक्षक श्री विकास गवंडी व त्यांचे प्रशिक्षण सहाय्यक यांनी दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी फार्मर कप साठी तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी उप कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी हे मेंटॉर म्हणून रजिस्टर झाले असल्याचे सांगून या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात निश्चित वाढ होणार असल्याचे सांगितले.
यावेळी कृषी विभागामार्फत महाविस्तार ए आय या ॲपच्या प्रचारासाठी स्टॉल उभारण्यात आला होता तसेच कृषी समृद्धी योजनेतील अवजारांची माहिती देण्यासाठी विविध कृषी औजारे,यंत्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
यावेळी माजी सभापती श्री राजेंद्र परब, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष श्री प्रताप चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. नवनाथ शिंदे, सुरज कोळसे,
शुभम कुरुंदवाडकर
यांनी सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य केले.
शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मालवण तालुक्यातील सर्व उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा खोत यांनी केले.












