दोडामार्ग: सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील पांडवकालीन इतिहास लाभलेल्या साटेली गावातील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिर परिसरात २७ नोव्हेंबर रोजी पुरातन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार व शिखरकलश प्रतिष्ठापना सोहळा भव्य उत्साहात पार पडणार आहे. या पारंपरिक धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
साटेली सातेरी मंदिर परिसरात पांडवकालीन शिवलिंग, नंदी व जुनी मंदिरे असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. या ठिकाणी नवीन मंदीर बांधून देवतांच्या मूर्तींची पुनःप्रतिष्ठापना करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
२५ नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून यात गणपती पूजन, श्राद्धांत, पुण्याहवाचन, प्राकार शुद्धी, देवतांचे शुद्धीकरण, अभिषेक इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. २६ नोव्हेंबरलाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मुख्य सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. शिखरकलश प्रतिष्ठापना, महादेव लिंगस्थापना (११.१० वा.), महापूजा, बलिदान, आरती, गार्हाणे व दर्शन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आहे. तसेच राजी संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.












