सोनुर्ली पोट्येकुंभेवाडी ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावर मोठे भगदाड

वाहनांसाठी धोकादायक : दुरुस्तीची मागणी

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
​मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सोनुर्ली येथील बांगडेवाडी, पोट्येकुंभेवाडी ते पाडलोस या रस्त्यावर जागोजागी भलेमोठे भगदाड पडल्याने हा मार्ग सध्या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर आणि ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

​ ​मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सदर रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले होते. मात्र, पाडलोस गावाच्या हद्दीवर मोरीवजा पुलाच्या भागातील जमिनीचा वाद कोर्टात गेल्याने, जमीन मालकाने दाखल केलेल्या दाव्यामुळे न्यायालयाने या रस्त्याच्या कामावर ‘जैसे थे’ आदेश दिला आहे. परिणामी, या विशिष्ट भागातील रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे.

​ ​यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धवट असलेल्या रस्त्याच्या कामाचा परिणाम आता दिसू लागला आहे. या रस्त्याच्या एका बाजूचा मातीचा भराव पूर्णपणे तुटून गेला आहे, ज्यामुळे रस्ता अधिक धोकादायक झाला आहे. तसेच, गेल्या दोन दिवसांत पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठे भगदाड पडले आहे, ज्यामुळे चारचाकी वाहने चालवताना मोठा धोका निर्माण झाला आहे.

​सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर आणि ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक यांनी सदर धोकादायक रस्त्याची पाहणी केली. पाडलोस मार्गे सोनुर्ली हा रस्ता अनेक वाहनधारक शॉर्टकट म्हणून वापरतात. न्यायालयीन वादग्रस्त भाग वगळता उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याने या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ​या मार्गावरून होणारी नियमित वाहतूक लक्षात घेता, मुख्यमंत्री ग्रामसडक कार्यालयाच्या संबंधित विभागाने या समस्येची तत्काळ दखल घ्यावी, पडलेले भगदाड बुजवून रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी श्री. गावकर यांनी केली आहे.
​सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन:
​उपसरपंच भरत गावकर व ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक यांनी या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांना विशेषतः चारचाकी वाहनचालकांना, वाहतूक करताना अत्यंत सुरक्षितता बाळगावी आणि काळजीपूर्वक वाहने चालवावीत, असे आवाहन केले आहे.