आ. केसरकर बनले पालखीचे भोई
सावंतवाडी । प्रतिनिधी : मार्गशीर्ष महिन्याचा मंगलमय प्रारंभ झाला असून, याच निमित्ताने श्री स्वामी समर्थांची पालखी माजी मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत सावंतवाडी शहरात एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक क्षण अनुभवता आला.
आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन होताच उत्साहात स्वागत करण्यात आले. श्री. केसरकर यांनी स्वतः पुजाअर्चा करून श्री स्वामी समर्थांची मनोभावे आरती केली. आरती झाल्यानंतर पालखीने पुढील मार्गाकडे प्रस्थान केले.
यावेळी एक अत्यंत भक्तिमय दृश्य पाहायला मिळाले. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्वतः पालखीचे भोई बनत पालखी खांद्यावर घेतली. राजकारणातील व्यस्तता बाजूला ठेवून या दोन्ही नेत्यांनी भक्तीत लीन होत स्वामी चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. या संपूर्ण वातावरणात उपस्थितांकडून “श्री स्वामी समर्थ” नामाचा अखंड जयघोष करण्यात आला, ज्यामुळे परिसर चैतन्यमय झाला होता.
यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दत्ता सावंत, आबा केसरकर, विश्वास घाग, अर्चित पोकळे, गजानन नाटेकर, समीर पालव आदी प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.













