सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील झिरंग परिसरात एका ३४ वर्षीय महिलेने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कादंबरी प्रशांत वंजारी असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कादंबरी वंजारी यांचा दीड वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या आणि त्यांच्यावर
डॉ. रुपेश धुरी यांच्याकडे उपचार चालू होते. गुरुवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला.
हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हवालदार मनोज राऊत आणि अनिल धुरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून घटनेची माहिती घेतली.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (AD) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक या करत
आहेत.











