मसुरे | झुंजार पेडणेकर :भारत संचार निगमचा बांदिवडे येथील मोबाईल टॉवर सेवा देण्यासाठी कुचकामी ठरत असून येथील ग्रामस्थ यांनी याविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या टॉवर वरून सुरवाती पासूनच चांगले नेटवर्क या भागात मिळत नसल्याने ग्रामपंचायतच्या वतीने मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात वेळोवेळी लक्ष वेधले होते. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही बिएसएनएल कडून करण्यात आलेली नसल्याचा आरोप सरपंच आशु मयेकर यांनी केला आहे. मध्येच फोन कॉल कट होणे, रेंज गायब होणे हे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. सद्य स्थितीत विविध शासकीय योजनाची केवायसी प्रक्रिया होत असल्याने ओटीपी साठी नेटवर्क नसल्यास ग्रामस्थाना गैरसोयीचे होत आहे. टॉवर ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढल्याने या टॉवरला कोणी वाली नसल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत आहे. या टॉवर मधील बिघाड तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, ग्रा. सदस्य नारायण परब यांनी दिला आहे.











