कारवाईस हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी/वेंगुर्ला: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसरात गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि मटका जुगार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करत एकूण चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सावंतवाडी पोलिसांनी दोन ठिकाणी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. पहिल्या घटनेत, संतोष प्रभाकर नेमळेकर (वय ४८, रा. माठेवाडा, सावंतवाडी) याला २५ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता सृष्टी बिल्डिंग समोर, पत्र्याच्या शेडच्या बाजूला सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या २७ दारूच्या बाटल्यांसह विक्रीच्या उद्देशाने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एपीआय खंदरकर आणि पोलीस हवालदार शिंगाडे यांनी केली.
दुसऱ्या कारवाईत, नितीन लक्ष्मण मल्हार (रा. बावळट, ता. सावंतवाडी) हा २६ नोव्हेंबर रोजी रात्री कारिवडे, गवळीवाडी येथे सुमारे २,४०० रुपये किमतीच्या २० दारूच्या बाटल्यांसह विक्रीच्या उद्देशाने मिळून आला. त्याच्याविरुद्धही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक आणि महिला पोलीस हवालदार दुधवडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने माजगाव परिसरात केलेल्या कारवाईत येगीमा लुईस अलमेडा (रा. माजगाव, ख्रिश्चनवाडी) यांच्या ताब्यात २,२०० रुपये किमतीच्या १८ बाटल्या दारू घेऊन आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध बारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बस त्यावर डिसोजा आणि प्रकाश कदम यांचा सहभाग होता.
याचबरोबर, वेंगुर्ला तालुक्यात कोलगाव येथे पोलिसांनी मटका जुगार चालवणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडले. सुजल शांताराम नाईक (रा. कोलगाव नुकेवाडी) हा वेंगुर्ला-बेळगाव रोडवर, कोळगाव चव्हाटा वाडी येथे मटका जुगार खेळताना मिळून आला. त्याच्याकडून दोन हजार रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करून जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई एपीआय शिंदे आणि हवालदार राऊत यांनी केली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या या पोलीस कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.









