ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाला चालना
शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील किंजवडे ग्रामपंचायत आयोजित वनराई बंधारा मोहीम बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी आंबोळ ओहोळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पर्यावरण संरक्षण, पाणलोट विकास आणि ग्रामविकास या प्रमुख उद्दिष्टांचा विचार करून ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
जलसंधारण, वनसंपत्ती संवर्धन, भविष्यातील जलतूट टाळणे आणि कृषी क्षेत्राला शाश्वत आधार मिळवून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी तसेच विविध विभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केले.
या मोहिमेत किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, उपसरपंच विनय पाडावे, पोलिस पाटील गुरूनाथ मिठबावकर, कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. उमाकांत पाटील, देवगडचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, देवगड तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील, प्रादेशिक फळ संशोधन उपकेंद्र रामेश्वरचे प्रभारी डॉ. अजय मुंज, किंजवडे सहाय्यक कृषी अधिकारी श्री महेश सोनार, किंजवडे ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेरसे व वरेरी ग्रामपंचायत अधिकारी नागनाथ भिसे, जि.प. प्रा. शाळा किंजवडे ठाकूरवाडीचे मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, जि.प. शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या सुयोग्य नियोजनामुळे आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वनराई बंधारा मोहीम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाला मिळालेली चालना सर्वत्र कौतुकास पात्र ठरली.











