गुहागर बायपास रोडवर कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न

अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे गुहागर बायपास रोडवर एका कॉन्ट्रॅक्टरला तिघा अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना २८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९:१० वाजताच्या सुमारास घडली.  

फिर्यादी अनिल मारुती चिले (वय ५८, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, रा. पाचाड) हे त्यांच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीने (क्र. MH-08-BE-7891) गुहागर बायपास रोडने घरी येत असताना, पांडवलेणीचे पुढील बाजूस वळणावर पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल गाडीसमोर आडवी लावली.  

त्यापैकी एकाने गाडीजवळ येऊन, “आमच्या गाडीला डॅश देऊन तुम्ही पळून जाता काय?” असे बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सोबतच्या दोघांनी फिर्यादीला खाली उतरण्यास सांगितले. फिर्यादी चिले यांनी “जर माझ्या गाडीची डॅश झाली असेल तर मी खर्च देण्यास तयार आहे,” असे बोलले. मात्र, आरोपींनी त्यांना गाडीतून बाहेर खेचले आणि रस्त्यावर पाडून त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, कपाळावर आणि उजव्या डोळ्याच्या खालील बाजूस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करून हे अज्ञात इसम तेथून निघून गेले.  

या घटनेनंतर, अनिल मारुती चिले यांनी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी १३:१९ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २७२/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६(२), ११५(२), ११८(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.