खारेपाटण येथे फासकीत अडकल्येला बिबट्या सुखरूप जेरबंद; वनविभागाची तातडीची कारवाई

कणकवली : खारेपाटण संभाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती खारेपाटणचे उपसरपंच श्री. महेंद्र गुरव यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि बिबट्याला सुखरूप फासकीतून बाहेर काढले.

उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कणकवली सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य राबविण्यात आले. पशुधन विकास अधिकारी सारिका दहिफळे यांच्या देखरेखीखाली मौजे खारेपाटण येथे जाऊन सदर बिबट्यास सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईदरम्यान बिबट्या तसेच स्थानिक नागरिकांना कोणतीही इजा झाली नाही.

या रेस्क्यू मोहिमेत धुळू कोळेकर (वनपाल, फोंडा), श्रीकृष्ण परीट (वनपाल, देवगड), वनरक्षक सुखदेव गळवे, विजय भोसले, प्रशांत कांबळे, शुभम पाटील, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, रोहित सोनगेकर, रामदास घुगे, वाहनचालक सागर ठाकूर, जलद कृती दलाचे रिद्धेश तेली, विठ्ठल बीडीए, मयूर राणे व निलेश मोरये यांचा सहभाग होता. तसेच सरपंच सौ. प्राची इस्वलकर व ग्रामस्थ सागर खांडेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले.