रत्नागिरी ः
मासेमारी करत असताना रविवार 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गावखडी येथील खाडीत बुडालेल्या प्रौढाचा मृतदेह सोमवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. त्याच खाडीत मिळून आला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अस्लम युनूस पेजे (50,रा.मुस्लिम मोहल्ला गावखडी,रत्नागिरी) असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ते गावखडी ग्रामपंचायत येथे शिपाई पदावर कार्यरत होते. तसेच त्यांचा मासेमारीचाही व्यवसाय होता. रविवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास ते आपली छोटी होडी घेउन मासेमारी करण्यासाठी गावखडी खाडीत गेले होते. त्याठिकाणी त्यांचा होडी चालवण्याचा व्हल्ला हातातून निसटला तो काढण्यासाठी ते पाण्यात उतरले असता तोल जाउन ते पाण्यात बुडाले होते. ते पाण्यात बुडत असताना गावडे-आंबेरे येथील जेटीवर असलेले चंद्रशेखर डोर्लेकर यांनी पाहिले. त्यांनी याबाबत गावखडी मोहल्ल्यात फोन करुन माहिती दिली. मोहल्ल्यात माहिती मिळताच तेथील ग्रामस्थ पेजे यांचा खाडीत शोध घेत असताना सोमवारी सकाळी 8 वा.सुमारास अस्लम पेजे यांचा मृतदेह गावखडी खाडीच्या पाण्यात मिळून आला.










