दहा प्रभागांतील दहा मतदान केंद्रावर सरासरी ७४.५५ टक्के मतदान
मतदान केंद्रावर रांगा लावत मतदारांकडून मतदान
मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला देणार धक्का
आता २१ डिसेंबरच्या निकालाची प्रतिक्षा
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी दहा प्रभागांतील दहा मतदान केंद्रावर सरासरी ७४.५५ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. राजापुरातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. शहारातील प्रभाग क्रमांक तीन मधील मतदान केंद्रावर सर्वाधिक म्हणजे ८०.२० टक्के इतके मतदान मतदान झाले. तर या प्रभाग क्रमांक सात मधील मतदान केंद्रावर सर्वाधिक कमी ६७.०७ टक्के इतके मतदान झाले. प्रभाग क्रमांक पाच व नऊ मधील मतदान केंद्रावर काहीकाळ मतदान यंत्रामध्ये बिघाड निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मतदान प्रक्रिया पुर्ववत सुरू केली.

एकूण दहा प्रभागातील ८ हजार १४३ मतदारांपैकी ६ हजार ७१मतदारांनी सकाळी ७.३० त. सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण ३ हजार ९२४ पुरूष मतदारांपैकी २ हजार ९७९ मतदारांनी तर एकूण ४२१९ महिला मतदारांपैकी ३ हजार ९२ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढला असून हा वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाला धक्का देणार आणि कोणाला लाभदायक ठरणार हे २१ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

शहरात सकाळी सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासात सरासरी १४.२५ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदारांनी शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती.सकाळी ९.३० वाजेपर्यंत ११६० मतदारांनी मतदानाचा हक्क् बजावला. यामध्ये ४४७ महिला तर ७१३ पुरूष मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली व शहरातील सर्वच मतदान केंद्रावर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४९,७४ टक्के इतके मतदान झाले होते. एकूण ८ हजार १४३ मतदारांपैकी ४०५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २०३० महिला तर २०२० पुरूष मतदारांचा समावेश होता.
त्यानंतर पुढील दोन तासात मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली. दुपारी ३.३० पर्यंत शहरातील सर्वच मतदान केंद्रावर सरासरी ६४.३४ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. यामध्ये एकूण ५ हजार २३९ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्यें २६६६ महिला तर २५७३ पुरूष मतदारांचा समावेश होता.
तर शेवटच्या दोन तासातही मतदानाच्या टक्केवारीत दहा टक्क्क्यांनी वाढ होऊन एकूण सरासरी ७४.५५ टक्के मतदान झाले. यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये ७६.२२ टक्के, प्रभाग क्रमांक दोन मध्ये ६९.९३ टक्के, प्रभाग क्रमांक तीन मध्ये ८०.२० टक्के, प्रभाग क्रमांक चार मध्ये ७९.६३ टक्के, प्रभाग क्रमांक पाच मध्ये ७४.४ टक्के, प्रभाग क्रमांक सहा मध्ये ७०.२८ टक्के, प्रभाग क्रमांक सात मध्ये ६७.६ टक्के, प्रभाग क्रमांक आठ मध्ये ७६.७२ टक्के, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ७८.८७ टक्के, तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये ७६. ५ टक्के इतके मतदान झाले. एकुण दहा प्रभागातील दहा मतदान केंद्रावर ७४. ५५ टक्के इतके मतदान झाले आहे.
राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापुर शहरात ही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांची राजापुरात भेट
जिल्हयात मंगळवारी चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतींसाठी मतदान झाले. जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांनी मंगळवारी दुपारी राजापुरात भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील काही मतदान केंद्रावरही भेट देत पहाणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी जिल्हयात अत्यंत शांततेच मतदान सुरू असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पत्रकारांना सांगितले. याप्रसंगी उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव उपस्थित होते.
प्रभाग क्र. ०५ आणि ०९ मध्ये मतदान यंत्रात काही काळ बिघाड निर्माण झाला होता मात्र प्रशासनाच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात आली. मतदान यंत्रातील बटण बिघडल्याने हा बिघाड निर्माण झाल्याची माहिती तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी दिली. सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रीया पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
गुलाल महायुतीचाच-श्रृती ताम्हनकर
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारासाठी आपण संपूर्ण शहरात फिरलो. यावेळी शहरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला त्याची प्रचिती मंगळवारी मतदानाच्या दिवशी दिसली. शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. त्यामुळे आपणासह सर्व सहकारी वीस नगरसेवकांचा विजय निश्चित असून २१ डिसेंबर रोजी राजापूरात महायुतीचाच गुलाल उधळणार अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रृती ताम्हनकर यांनी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे व आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राजापूर शहराच्या विकासासाठी महायुती काम करेले असेही त्यांनी सांगितले.
शाश्वत विकासासाठी महायुतीलाच कौल मिळणार-अपुर्वा सामंत
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक रथी महारथी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र मतदारांचा कौल हा राजापूर शहराच्या शाश्वत आणि सर्वांगिण विकासासाठी महायुतीलाच मिळणार यात तिळमात्र शंका नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना युवा नेत्या अपुर्वा सामंत यांनी दिली आहे. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर वर्षभरापुर्वी राजापूर वासियांनी दाखविलेला विश्वास सार्थ होत आहे. आता शहराच्या विकासासाठी नगर परिषदेच्या सत्तेच्या किल्या राजापूरकर महायुतीच्या हाती देतील असा विश्वास व्यक्त करतानाच महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रृती ताम्हनकर यांच्यासह आमचे सर्व नगरसेवक मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचा विजय मतदारांनीच केलाय निश्चीत- एड. हुस्नबानू खलिफे
राजापूरवासियांनी कायमच विकासाला आणि विकास करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिलेले आहे. त्यामुळे मंगळवारी मतदारांचा मतदानासाठी लाभलेला उत्फुर्त प्रतिसाद म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीचा विजय निश्चीतच केला असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार माजी आमदार एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत धाकदडपशाही करण्यात आल्याचा आरोप करतानाच मतदाना दिवशी शहराबाहेरील लोक मतदान केंद्राच्या परिसरात झुंडशाही करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र राजापूरकर अशा धाक दडपशाही झुंडशाहीला धारा देत नाहीत हे निकालादिवशी स्पष्ट होईल. महाविकास आघाडी निर्वीवाद बहुमताने सत्तेवर येईल असा दावा केला.










