कणकवली, सावंतवाडी मालवण व वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत ७४.२५ टक्के मतदान.

उद्याची मतमोजणी रद्द होऊन २१ डिसेंबरला होणार

कणकवलीत ७९.७१ टक्के विक्रमी मतदान:

सिंधुनगरी प्रतिनिधी

जिल्ह्यातील सावंतवाडी मालवण वेंगुर्ला नगरपरिषदा व कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष नगरसेवक निवडणुकीसाठी मंगळवारी ७४ मतदान केंद्रावर काही अपवाद वगळता शांततेत व सुरळीत मतदान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीत एकूण ७४.२५ टक्के मतदान झाले. नकाराध्यक्ष पदाचे १८ उमेदवार व नगरसेवक पदासाठी २७१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले. उद्या बुधवारी होणारी मतमोजणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. आता २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून उमेदवार व राजकीय पक्ष नागरिकांची उत्सुकता तोपर्यंत ताणली जाणार आहे.

सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रातील २१ मतदान केंद्रावर ६९ टक्के मतदान झाले. मालवण नगर परिषद क्षेत्रातील २० मतदान केंद्रावर ७४.०४ टक्के मतदान झाले. वेंगुर्ला नगरपरिषद क्षेत्रातील १६ मतदान केंद्रावर ७४.२८ टक्के मतदान झाले. कणकवली नगरपरिषद मधील १७ मतदान केंद्रावर विक्रमी व जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान ७९.७१ टक्के झाले.

निवडणूक निकाल लागेपर्यंत निवडणूक आचारसंहिता लागू राहते मात्र या जिल्ह्यातील निवडणूक पूर्ण झाल्यामुळे निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील आचारसंहिता शिथिल होईल अशी शक्यता आहे.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले होते. सर्वात जास्त मतदान कणकवली नगरपंचायत क्षेत्रात ६७.३२ टक्के झाले होते. तर सावंतवाडी ५३.८९ टक्के, मालवण ६१.४८ टक्के, वेंगुर्ला ५७.०८ टक्के मतदान झाले होते. ही आकडेवारी पाहता निवडणुकीत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विक्रमी मतदान होईल.