सावंतवाडी शहरात मोकाट गुरांवर नगरपरिषदेची धडक कारवाई

AWBI च्या निर्देशानुसार कोंडवाड्यात जेरबंद करण्याची मोहीम सुरू

​सावंतवाडी :
भारतीय प्राणी कल्याण मंडळ (Animal Welfare Board of India – AWBI) यांच्या पत्र क्र. AC-02003/1/2026-AWBI, दिनांक १४ जुलैच्या निर्देशानुसार पावसाळा व नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्राण्यांच्या संरक्षणासाठी सर्व नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्था यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पत्राच्या अनुषंगाने आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांना नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात जेरबंद करण्याची विशेष मोहीम २८ जुलै २०२६ पासून हाती घेण्यात आली आहे.

​ही मोहीम सावंतवाडी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री. विनोद सावंत आणि मुकादम श्री. शेखर मेहत्तर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. पावसाळ्यात सार्वजनिक रस्त्यांवर व मोकळ्या जागी फिरणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, तसंच अपघात आणि आपत्कालीन प्रसंगी गुरांच्या जीवाचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर प्राण्यांचे संरक्षण आणि शहरातील स्वच्छता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी नगरपरिषदेने हे पाऊल उचलले आहे.

​या मोहिमेच्या अनुषंगाने नगरपरिषदेतर्फे सावंतवाडी शहरातील सर्व गुरेमालकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या मालकीची गुरे स्वतःच्या जागेत बांधून ठेवावीत. जर कोणाची गुरे शहरातील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यांना तात्काळ पकडून नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात जमा केले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी गुरेमालकांची राहील, याची नोंद घ्यावी, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.