८०२० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; ३९९५ पुरूष तर ४०२५ महिलांनी मतदान केले*
उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद*
मतदान शांततेत पार पडले; प्रभाग क्र. १५ मधील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ बिघाड*
निलेश जाधव / देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये एकूण ७४.३३ टक्के इतके मतदान झाले. एकूण ८०२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३९९५ पुरूष तर ४०२५ महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. १५ मध्ये मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाला होता. मात्र तात्काळ हा बिघाड दूर करून मतदान सुरू करण्यात आले. दरम्यान, या निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे. मात्र मतमोजणीची तारीख पुढे गेल्याने उमेदवारांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते निराश झाले आहेत.
देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ होती. दिवसभरात शांततेत व सुरळीतपणे मतदान पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांचा या मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती मात्र दुपारनंतर यामध्ये वाढ झाली व मतदानाची टक्केवारी कमालीची वाढली. मतदानासाठी नागरिक अगदी उत्स्फूर्तपणे घरबाहेर पडले. वयोवृध्द मतदारांची संख्याही लक्षणीय होती. मतदान केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पहावयास मिळाले.
सकाळी ७.३० वा. मतदानाला सुरूवात झाली. मात्र गेले काही दिवस सकाळच्या वेळेस थंडी पडत असल्यामुळे मतदारांचा प्रतिसाद कमी मिळाला. साधारणपणे सकाळी १० वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढण्यास सुरूवात झाली. दुपारनंतर तर मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली. या निवडणुकीसाठी एकूण १०७८९ इतके मतदार असून यामध्ये ५२०८ पुरूष तर ५५८१ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. सकाळी ९.३० वाजेपर्यंत १६ % मतदान झाले आहे. यात १७१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात पुरुष १००५ व महिला ७१३ यांचा समावेश आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३२. ८६ % टक्के इतके मतदान झाले असून ३५४५ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये १८९७ पुरुष व १६४८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ३६. ४ % तर महिला २९.५३ % अशी टक्केवारी आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत ५१. ७७ % टक्के इतके मतदान झाले असून ५५८६ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये २७६३ पुरुष व २८२३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ५३. ०५ % तर महिला ५०. ५८ % अशी टक्केवारी आहे. ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ % टक्के इतके मतदान झाले असून ६९६५ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ३४५९ पुरुष व ३५०६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ६६. ४१ % तर महिला ६२.८२ % अशी टक्केवारी आहे. दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीने कुणाला तारणार? व कुणाचा टांगा पलटी होणार? हे येत्या २१ तारखेला स्पष्ट होणार आहे.











