कडेकोट पोलिस बंदोबस्त
२४ तास सशस्त्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था
लांजा : लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लांजा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर बुधवारी ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र आता हा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर मतपेट्या या सध्या लांजा नगर पंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी स्ट्रॉंग रूम बनविण्यात आला आहे. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे (कोल्हापूर) १० हत्यारी जवान तैनात करण्यात आलेले आहेत. याशिवाय १० पोलीस कर्मचारी (हत्यारी) २४ तास डोळ्यात तेल घालून सुरक्षा देत आहेत. त्यांच्यावर प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक देखील लक्ष ठेवून आहेत.
दि. २१ डिसेंबर पर्यंत मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा अभिजीत कुंभार यांनी सांगितले.











