रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला

 (६ ते १० डिसेंबर)

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीकरिता हवामान आधारित कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. या पाच दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिनांक ०८ डिसेंबर रोजी मेघ अच्छादन मुख्यत्वे निरभ्र राहण्याची शक्यता असून ०६ व ०७ डिसेंबर रोजी अंशतः ढगाळ आणि ०९ व १० डिसेंबर रोजी निरभ्र राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ८ ते १० किमी/तास दरम्यान असेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले:

सामान्य सल्ला: सध्या कोरडे हवामान असल्याने पिकांच्या गरजेनुसार आणि योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच रब्बी पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांवर योग्य बुरशीनाशकाची प्रक्रिया करून बियाण्यातून व मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करावे.

आंबा आणि काजू: किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने आंबा आणि काजू बागांची नियमित पाहणी करावी. आंबा बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास ढगाळ व दमट हवामानामुळे तुडतुडे, शेंडे पोखरणारी अळी आणि गॉल मिज (मिजमाशी) यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. प्रादुर्भाव दिसून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुईमूग आणि मोहरी: भुईमूग आणि मोहरी पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी भुईमुगासाठी चांगल्या कुजलेल्या शेणखतासह खतांच्या पूर्ण मात्रा मातीत मिसळाव्यात. मोहरीची पेरणी ४५ x १० सें.मी. अंतरावर करावी.

भाजीपाला: मिरची, वांगी आणि टोमॅटोची ४ ते ६ आठवड्यांची रोपे सायंकाळच्या वेळी लावावीत. माठ, मुळा, कोथिंबीर, पालक आणि मेथी पिकांची पेरणीची कामे सुरू करावीत.

पशु/कुकुटपालन: किमान तापमानात घट होत असल्याने जनावरांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून गोणपाटाचे पांघरूण घालून गोठ्यामध्ये उबदार वातावरण राखण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. कुकुट पक्ष्यांसाठीही शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब लावावेत.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.