खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे-बोरज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांना विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण व पूजन करून करण्यात आली. यानंतर सहाय्यक शिक्षिका सौ. खामकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महान कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यांचे संविधान निर्मितीतील योगदान, समाजातील वंचित घटकांसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणाबद्दलचे विचार यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे यांनीही डॉ. आंबेडकरांचे समाज सुधारक म्हणून असलेले कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि शैक्षणिक परिवर्तनाची भूमिका यावर मार्गदर्शक भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक श्री. प्रवीण कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे, संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












