आचल फाउंडेशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा दिमाखात पार; स्नेहज्योती अंध विद्यालय व उत्तमकुमार जैन गौरवाने सन्मानित

खेड  : आचल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने प्रदान केले जाणारे वार्षिक प्रतिष्ठेचे पुरस्कार यावर्षी अत्यंत दिमाखदार वातावरणात मीरा-भाईंदर येथील भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटोरियममध्ये पार पडले. विविध क्षेत्रातील सामाजिक योगदान, शैक्षणिक कामगिरी, कला-साहित्य आणि युवा कार्यकर्त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार, उद्योगपती, समाजसेवक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
या वर्षीच्या सोहळ्यात स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी या संस्थेला शैक्षणिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी स्वीकारला. अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेच्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. तसेच सामाजिक युवा पुरस्कार हा उत्तमकुमार जैन यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यात सातत्य आणि प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या या तरुणाचा सन्मान करताना उपस्थित पाहुण्यांनी त्याच्या कार्याची पावती दिली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्नेहज्योती अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली मराठी प्रार्थना प्रेक्षकांच्या मनाला भिडली. या सादरीकरणाने अवघ्या सभागृहाला भावूक केले. कलाकार पायल सिंग यांनी मुलांचे विशेष कौतुक करत त्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती अजय सेठ, सुनील शेट्टी (CEO – आर्ट मीडिया व डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज), तसेच प्रसिद्ध अभिनेता अभिषेक खन्ना उपस्थित होते. याशिवाय आचल चारिटेबल फाउंडेशनचे संजय कपूर, रानू कपूर, विजय राय, पार्श्वगायिका वर्षा सिंग, कॅप्टन बी.पी. सिंग, मिली सिंग, जेष्ठ संगीतकार नंदू केरकर (सहकारी R.D. बर्मन व बप्पी लाहिरी), अभिजित केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध अभिनेते लिलीपुट यांनी या सोहळ्यात बोलताना, “कर्तव्य भावनेतून केलेले प्रत्येक कार्य म्हणजे समाजसेवेचा धडा असतो,” असे मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या शब्दांना प्रेक्षकांनी एकमुखाने दाद दिली. कार्यक्रमात संगीत, कला व क्रीडा आदी विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना विशेष ट्रिब्यूट देण्यात आला. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांमधील गीतांचे सादरीकरण प्रख्यात गायकांनी करून सभागृहाला जुन्या सुरेल आठवणींच्या जगात नेले. समाजसेवा, शिक्षण आणि कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करणारा हा सोहळा यंदाही भव्यतेने पार पडत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला.