मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा इशारा, खेड तहसीलला निवेदन
खेड(प्रतिनिधी)कोकणातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत प्रस्ताव तयार करावेत. तसे न झाल्यास शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिला आहे.
याबाबत येथील तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदनही दिले आहे. सलग आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात पेरणी करता आली नाही. यामुळे अजूनही वाफे तयार झाले नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पावसाच्या संततधारेमुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. धुळफेवरच्या पेरण्या झाल्यानंतर तत्काळ रुजवा होऊन वाफे तयार होतात. बदलत्या हवामानासह पावसामुळे शेती
पाण्याखाली गेली. यामुळे पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत.
यामुळे शेतकरी चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. या शेतकऱ्यांना तातडीची नुकसानी भरपाई देण्यासंदर्भात वरिष्ठस्तरावर पत्रव्यवहार करावा, अशी आग्रही मागणीही करण्यात आली आहे. याप्रसंगी मिलिंद नांदगावकर, हेमंत वणजू विनोद भुवड, अक्षय जांभुलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.












