भाट्ये येथे दोन दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

रत्नागिरी:
शहराजवळील भाट्ये येथे दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात इलेक्ट्रीक दुचाकीवरील चालकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. दुखापतीस व मरणास कारणीभूत ठरलेल्या संशयित चालका विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अख्तर यासिन साखरकर ( ३८, रा. नवानगर भाट्ये, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास फणसोप ते रत्नागिरी रस्त्यावरिल भाट्ये येथील नझीर उस्मान वाडकर यांच्या घरासमोर घडली. संशयित अख्तर साखरकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी ( एमएच-०८ एयू -९४७५) वरून पत्नी वफा अख्तर साखरकर व मुलगा मोहम्मद यांना घेऊन फणसोप ते रत्नागिरीकडे येत होता. भाट्ये येथील नजीर वाडकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर आला असता समोरुन येणार इलेक्ट्रीक दुचाकी ( एमएच -०८ बीएफ ३२८५) वरील चालक प्रशिल सुनिल साळवी याला भरधाव वेगाने डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. या अपघातत प्रशिल साळवी रस्त्यावर पडून बेशुद्ध झाला.त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान प्रशिलचा मृत्यू झाला. तसेच संशयित स्वाराच्या मागे बसलेले पत्नी व मुलगा यांना लहान मोठी दुखापत झाली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.