आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनतर्फे ‘वंदनीय मावशीबाई केळकर – एक तेजस्वी दीपस्तंभ’ नाटिकेचे प्रभावी सादरीकरण

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात कार्यक्रम संपन्न

 माखजन:

स्त्रीशक्तीच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशन तर्फे प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर येथे ७ डिसेंबर रोजी “वंदनीय मावशीबाई केळकर – एक तेजस्वी दीपस्तंभ” या नाटिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई (मावशीबाई) केळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ही नाटिका डॉ. वृषाली शिलेदार यांच्या संकल्पनेतून, तर डॉ. छाया नाईक यांच्या लेखणीतून आकारली आहे. प्रकल्प प्रमुख सौ. जयश्री धर्माधिकारी व पालक सौ. आरती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला.

आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशन ही फक्त संस्था नसून स्त्रीशक्तीची सकारात्मक, सशक्त आणि विधायक ओळख निर्माण करणारी एक विचारधारा आहे. देशभरातील ३३ शहरांमधील ५१ समूहातून ३५०० हून अधिक महिलांसह कार्यरत असलेल्या या मंचामार्फत महिलांना नेतृत्व, आयोजन, कौशल्य विकसन आणि आत्मविश्वास वृद्धीची संधी मिळते.

मुंबई शाखेतील बहिणींनी या नाटिकेचे दिग्दर्शन आणि अभिनय स्वतः सांभाळत एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी प्रयोग सादर केला. मावशीबाईंची भूमिका साकारणाऱ्या पौर्णिमा देशपांडे हातेकर यांनी नेत्रदीपक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. पल्लवी रानडे, नूतन भोपे, अर्चना दाणी, गीता वैद्य, अस्मिता पटवर्धन,ज्ञानेश जोशी आणि ऋतुजा परांजपे यांनीही आपल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या.

प्रेक्षकांकडून नाटिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रयोगादरम्यान सभागृहात पसरलेले शांत वातावरण आणि अनेकांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हे नाटिकेच्या प्रभावाची साक्ष देत होते.

या उपक्रमाला समितीचे पदाधिकारी, लेखक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि रसिक प्रेक्षक यांची उपस्थिती लाभली. या नाटिकेच्या यशस्वी सादरीकरणासाठी योगदान देणाऱ्या सर्व संघटिका, सहसंघटिका, समितीच्या कार्यकर्त्या आणि सहयोगींचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.