वलसाड हापूस मानांकन मिळण्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा विरोध

दापोली :  महाराष्ट्राची कोकण किनारप‌ट्टी ही आंबा उत्पादनासाठी जगामध्ये नावाजलेली आहे. कोकणामध्ये हापूस आंब्यासाठी सुमारे पावणे दोन लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर लागवड झालेली आहे. कोकणामध्ये हापूस आंब्याचा इतिहास हा सुमारे ३५० ते ४०० वर्षांचा आहे. मुळामध्ये पोर्तुगिजांमार्फत भारतात ही जात अल्फान्सो या नावाने आली. मात्र या जातीला हापूस हे नाव कोकणवासियांनी दिलेले आहे. हापूसला मिळालेली प्रसिध्दी ही कोकणातील विशिष्ठ अशा हवामान व जमिनीच्यामुळे येणाऱ्या विशिष्ठ स्वाद व चवीमुळे आहे. हापूस या आंब्याला असलेली विशिष्ठ स्वाद, रंग, चव, आकार हा फक्त आणि फक्त कोकणातील वैशिष्टयपूर्ण जमीन, हवामान आणि पीक उत्पादन पध्दतीमुळे आहे.

कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सन २००६ पासून प्रयत्न करण्यात आले. याचवेळी देवगड हापूस (Applications GI-379) आणि रत्नागिरी हापूस (Applications G1-479) स्वतंत्र प्रस्ताव होते. मात्र दोन्ही प्रस्ताव (अर्ज) एकत्र करुन जी-आय सजिस्ट्री, चेन्नई यांचेकडून (GI Applications No.139) अर्जानुसार दोन्ही (देवगड, रत्नागिरी) एकत्र करून सन २०१८ मध्ये कोकणातील पाच जिल्हयांसाठी हापूस आंबा भौगोलिक मानांकन घेण्यात आले. the name of the Gl is amended as अल्फांन्सो कोकण हापूस उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकार संस्था, रत्नागिरी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली हे नोंदणी करणारे रजिस्ट्री आहेत.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्थापनेपासून हापूस आंब्याची प्रत, उत्पादन टिकून ठेवण्यासाठी पीक उत्पादन पध्दत विकसीत केली आहे. त्याचा अवलंब शेतकरी करीत आहेत. कोकण कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या अभिवृध्दी पध्दतीमुळे मोठ्या प्रमाणावर कलमांची निर्मिती होऊन ही कलमे भारतामध्ये व भारताबाहेर अनेक ठिकाणी गेली आहेत. या प्रत्येक ठिकाणांहून त्या-त्या प्रदेशाच्या नावामागे हापूस हा शब्द जोडून मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे झाले तर तो कोकणाच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल. विशेषतः कोकणाव्यतिरिक्त इतर प्रदेशामध्ये उत्पादित केलेल्या अल्फांसोच्या फळामध्ये कोकणाच्या हापूस आंब्याची चव, स्वाद, रंग येत नाही वास्तविक पाहता हापूस ही वेगळी जात असून ती २००३ साली कोकण कृषि विद्यापीठाने प्रसारीत केली आहे.

वलसाड हापूस आंबा जो की, मानांकनासाठी जी-आय रजिस्ट्री, चेन्नई यांच्याकडे भारतीय किसान संघ, गांधीनगर, आणि नवसारी कृषि विद्यापीठ नवसारी, गुजरात यांनी दिनांक ०९/०२/२०२५ रोजी अर्ज केला. त्यानुसार जी-आय रजिस्ट्री यांना दिनांक १४/१०/२०२४ रोजी कायदेशीर विरोध डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते संस्था, मर्या. रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आला. वलसाड हापूस जी आय नोंदणीसाठी दिनांक ३०/११/२०२५ बौध्दीक संपदा भवन, मुंबई येथे सुनावणी करण्यात आली. मात्र मा. अॅड. हिमांशु काणे, मुंबई यांनी मुद्देसुद हापूस/अल्फांन्सो आणि वलसाड हापूस यातील तांत्रिक, कायदेशीर फरक पटवून दिला. कोटनि भारतीय किसान संघ, गांधीनगर यांना एक महिन्याची मुदत देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी संधी दिली आहे. वरील सुनावणी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली असून कोकण हापूस/अल्फांसो मानांकन निश्चितच अबाधित राहील अशी विद्यापीठाला खात्री आहे. जर निकाल विद्यापीठाच्या विरोधात गेला तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत पुढे सर्वोच्च न्यायालयामार्फत दाद मागितली जाईल.