राजापूरः येथील राजापूर नगर परिषदेतील सेवानिवृत्त मुख्य लिपिक आणि चव्हाणवाडी येथील रहिवाशी नंदकुमार अनंत चव्हाण (७१) यांचे पहाटे मुंबई येथे निधन झाले. सेवानिवृत्त ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विलास उर्फ बापू चव्हाण यांचे ते कनिष्ठ बंधू होत. गेले काही महिने आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
राजापूर नगर परिषदेच्या प्रशासनात त्यांनी अनेक वर्षे जकात निरीक्षक म्हणून प्रभावीपणे काम केले होते. कालांतराने त्यांच्याकडे मुख्य लिपिकपदाची जबाबदारी आली होती. उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक होता. एक फेब्रुवारी १९८३ रोजी ते न.प.च्या सेवेत रूजू झाले होते तर ३० जून २००९ ला ते सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते काही कालावधी शहराबाहेर वास्तव्याला होते. त्यानंतर पुन्हा त्यांचा रहिवास शहरात होता. गेले काही महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी उशीरा त्यांचे पार्थिव राजापूर येथील निवासस्थानी आणण्यात आले व त्यानंतर वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटना तसेच भंडारी हितव र्धिनी मंडळाच्या वतीने शोक व्यक्त करीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.












