खेड । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठी कारवाई घडत असून एका प्रसिद्ध उद्योजकाच्या खेड पाठोपाठ सावर्डे येथील कारखान्यावर आज सकाळपासूनच शासकीय यंत्रणेने धाड टाकली आहे. ही धाड अंमलबजावणी संचालन संचालनालयाने (ईडी)ची असल्याचे सांगण्यात येत असून पहाटेच ईडीचे पथक कारखान्यात दाखल झाले असून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारखान्यातील कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.
रत्नागिरीतील या प्रस्थापित उद्योजकाचे येथील राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या नावांशी निकटचे संबंध असल्याची चर्चा जिल्ह्यात नेहमीच रंगत असते.
नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र सकाळपासून चाललेल्या या तपासामुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता वाढली असून कारखान्याच्या आसपासच्या परिसरातही मोठी हालचाल दिसून येत आहे. ईडीची ही धाड कोणत्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे, यावर सध्या तर्क-वितर्क सुरू असून पुढील काही तासांत याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.











