पाटपन्हाळे ग्रामपंचायत मार्फत शृंगारतळी बाजारपेठेत पावसाळी पाण्याचे उत्तमरित्या नियोजन 

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील शृंगारतळी ही मोठी बाजारपेठ मानली जाते. गुहागर विजापूर महामार्गाचे काम सुरू असताना शृंगारतळी बाजारपेठेत मागील एक दोन वर्षापूर्वी रस्त्यालागत असणाऱ्या घरात, दुकानात पाणी भरले होते. तसेच महामार्गावर सुद्धा पाण्याचे तळे साचायचे. अनेक जणांच्या तक्रारी ग्रामपंचायतीला यायच्या परंतु ह्यावर्षी पाण्याचे नियोजन उत्तमरित्या करायचे असे ग्रामपंचायतीने ठरवले. महामार्गालगत असलेल्या गटाराला लागून असलेली माती महामार्ग ठेकेदारकडून काढण्यास सांगण्यात आले. तसेच गटाराला पाणी जाण्यासाठी असलेल्या भागाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सफाई करण्यात आली. तसेच आजूबाजूच्या परिसरातील गटारे, नद्यांची सफाई करण्यात आली. विशेष म्हणजे शृंगारी रोड वरून मोठया प्रमाणावर येणारे पाणी महामार्ग ठेकेदाराकडून गटाराला चेंबर पाडून त्याला नाल्याच्या द्वारे योग्य पद्धतीने सोडण्यात आले. तसेच गोल्डन बेकरी पासून जमणाऱ्या पाण्यासाठी नाला पाडणे, मोहनशेठ संसारे घरापासून पाण्यासाठी नाला पाडणे, जुनी गटारे सफाई करणे, जानवळे फाटा (इब्राहिम चौक) येथे महामार्ग ठेकेदार मार्फत मोऱ्या टाकणे या कामांचे उत्तम नियोजन ग्रामपंचायत पाटपन्हाळे यांनी या पावसाळ्यात केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या येत्या ४/५ दिवसात अजून मोठया प्रमाणावर पाऊस पडणार असून काही समस्या अथवा अडचण आल्यास ग्रामपंचायतच्या +९१९५६१०४४३७३ या क्रमांकावर, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी यांचेकडे लगेच संपर्क साधवा असे आवाहन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.विजय तेलगडे व उपसरपंच श्री.आसीम साल्हे यांनी केले आहे.