Breaking: शनिवारी पहाटे रत्नागिरी एमआयडीसीतील क्वालिटी प्रिंटर्स कार्डबोर्ड कंपनीला भीषण आग

Screenshot
कंपनीच्या कार्यालयाचे बरेचसे नुकसान; कंपनीचे कामकाज मात्र सुरळीत 

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील क्वालिटी प्रिंटर्स या कार्डबोर्ड उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला आज पहाटे सुमारे ४.३६ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कारखाना आपल्या कवेत घेतला. या आगीत ऑफिसचा बराचसा भाग जळून खाक झाला.

 

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीच्या तीव्रतेमुळे परिसरात दाट धूर पसरला असून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र,ऑफिसला आगीचा फटका बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून आगीच्या कारणांचा सविस्तर तपास सुरू आहे. वेळेत आग आटोक्यात आल्यामुळे शेजारील औद्योगिक युनिट्सना धोका टळला असून, अग्निशमन दलाच्या तत्पर आणि कार्यक्षम कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. MIDC अग्निशामक दलाकडून घटनास्थळी अग्निशामक अधिकारी व्ही. के. राणे, प्रमुख अग्निशमन विमोचक डी. एस. दळवी, एस. डी. महाडीक, पी. इ. राठोड, पी. व्ही. पवार, के. व्ही. जाधव, एस. जे. गायकवाड, पी. बी. मोरे, एस. बी. पाटील, व्ही. के. गोसावी यांचा समावेश होता.