रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष रोटे. अविनाश पालशेतकर यांनी अध्यक्षीय वर्ष यशस्वीपणे केले पूर्ण

समाजोपयोगी प्रकल्पांनी भरलेला कार्यकाळ

चिपळूण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब चिपळूणच्या २०२४-२५ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर रोटे. अविनाश पालशेतकर यांनी आपले अध्यक्षीय वर्ष विविध उपक्रमांनी यशस्वीपणे पूर्ण केले. या वर्षभरात समाजाभिमुख व सेवाभावी असे अनेक प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात आले.
या कार्यकाळात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, संगीत तसेच गरजूंसाठी वैद्यकीय उपकरणांची मदत अशा विविध क्षेत्रांत उपक्रम हाती घेण्यात आले. प्रमुख प्रकल्पांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वरधारा हा श्रावण निमित्त संगीत कार्यक्रम, दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रम, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी रोबॉटिक्स कार्यशाळा, महिला दिनानिमित्त मुलींसाठी शिलाई मशीन वाटप, वृक्षारोपण मोहीम योजनेत सहभाग आदींचा समावेश होता. चिपळूणच्या सौंदर्यामध्ये भर म्हणून चिंचनाका व इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे कारंजे उभारण्यात आले. डिस्टिक्ट ३१७० मधून विशेष सहकार्य रोटे अजय मेनन, Deputy DRFC & DGSC व रोटे. अशोक नाईक, DG २०२७-२८ यांनी मोलाचे सहकार्य दिले. अध्यक्षीय कार्यकाळ पूर्ण करताना काही विशेष मित्रांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि मदतीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “श्रीकृष्णाने जशी अर्जुनाला महाभारताच्या रणांगणात दिशा व धैर्य दिलं, तशीच दिशा, ऊर्जा आणि मानसिक आधार प्रसाद सागवेकर, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, राजीव गांधी, मंगेश माटे, दिनकर पवार, प्रशांत देवळेकर व त्याची टीम, प्रकाश लटके या मित्रांनी या वर्षभर दिली. माझ्या अध्यक्षीय प्रवासात हे मित्रच माझे ‘श्रीकृष्ण’ ठरले,” असे श्री. पालशेतकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले. क्लबमध्ये वेगवेगळे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी या मित्रांनी वेळोवेळी मार्गदर्शन, पाठिंबा आणि अडचणीच्या क्षणी साथ दिली. केवळ योजनाच नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीतही या मित्रांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. “नेतृत्व एकट्याचं नसतं; त्यामागे एक विश्वासू टीम आणि सच्चे मित्र असावे लागतात. माझ्या अध्यक्षीय वर्षात माझ्या काही सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवत प्रत्येक क्षणी खांद्याला खांदा लावून काम केलं,” असेही त्यांनी नमूद केले. कार्यकाळाच्या शेवटी या सर्व ‘श्रीकृष्ण’ मित्रांचे श्री. पालशेतकर यांनी मन:पूर्वक आभार मानले आणि अशा सहकार्यानेच रोटरीची सेवा अधिक प्रभावी होते हे अधोरेखित केले. या सर्व प्रकल्पांमागे क्लबच्या सर्व सदस्यांचे योगदान, मार्गदर्शन आणि सहकार्य महत्वाचे ठरले. या वर्ष कालावधीत माझे सहकारी रोटे. राजेश ओतारी यांचे सचिव म्हणून मोलाचे सहकार्य लाभले, तसेच रोटे. स्वप्नील चिले यांनी खजिनदार म्हणून काम उत्तम प्रकारे काम पाहिले. त्यांच्यामुळेच वर्षभर काम करणे सोपे झाले असे अध्यक्ष यांनी आवर्जून सांगितले. रोटे. अविनाश पालशेतकर यांनी अध्यक्षीय वर्ष संपताना सर्व सदस्यांचे, मार्गदर्शकांचे आणि सामाजिक संस्थांचे तसेच प्रकल्प मार्गदर्शक यांचे मनपूर्वक आभार मानले. पुढील वर्षाच्या नवीन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. रोटरीच्या “सेवा सर्वात मोठी” या तत्त्वाला अनुसरून हे वर्ष रोटरी क्लब चिपळूणसाठी सामाजिक सहभागाचे आणि प्रेरणादायी कार्याचे प्रतीक ठरले.