कारची एक्टिव्हा दुचाकी ला पाठीमागून धडक, दोघे जखमी

मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एक्टिव्हा दुचाकी ला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेजण जखमी झाल्याची घटना आज शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे घडली.
याबाबतची फिर्याद पांडुरंग महादेव सुर्वे (वय ६५ राहणार कुवे मराठवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.‌ त्यांचा भाऊ विठोबा महादेव सुर्वे (वय ६९, राहणार कुवे मराठवाडी तालुका लांजा) हे आज शनिवारी सकाळी आपल्या ताब्यातील एक्टिव्हा दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए एफ १६४९ घेऊन रत्नागिरीच्या दिशेने चालले होते. या दुचाकीवर त्यांचा नातू प्रसन्न विशाल सुर्वे (व १३ राहणार कुवे मराठवाडी लांजा) हा बसला होता. त्यांची एक्टिव्हा दुचाकी वेरळ येथील हॉटेल प्रीतम प्रसाद समोर आली असता पाठीमागून आलेल्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आय २० कार (क्रमांक एम एच ०५ सीएम ७९६२) ने ऍक्टिव्हाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही कार श्रीहरी गिरीजन नायर (वय २३, राहणार अंबरनाथ ठाणे) हा चालवित होता.
कारने एक्टिव्हा दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत ऍक्टिव्हा चालक विठोबा सुर्वे आणि त्यांचा नातू प्रसन्न सुर्वे हे दोघेही जखमी झाले.‌ त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.‌ या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता कार हयगयीने आणि वेगाने चालवून ॲक्टिव्हा दुचाकी चालक व पाठीमागे बसलेला असे दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी कारचालक श्रीहरी नायर याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम २८१, १२५( अ), १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.