दोडामार्गात महसूल विभागाची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त, दीड लाखांहून अधिक दंड

दोडामार्ग | प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोहीम तीव्र केली आहे.

दोडामार्ग येथे करण्यात आलेल्या कारवाईत, अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर जप्त करण्यात आला असून, संबंधित डंपर मालकाला १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

न

रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक डंपर वाळू घेऊन बांदा ते कसई-दोडामार्ग असा जात होता. यावेळी झोळंबेचे तलाठी श्रीराज सांबारी यांनी संशयावरून हा डंपर तपासणीसाठी थांबवला. चालकाकडे वाळू वाहतुकीच्या अधिकृत पासबद्दल विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही. परिणामी, हा डंपर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मागील दहा दिवसांत महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण तीन डंपरवर कारवाई केली आहे.

 

खडी वाहतुकीकडे डोळेझाक का? स्थानिक जनतेचा सवाल

एकीकडे वाळू वाहतुकीवर कारवाई होत असतानाच, स्थानिक पातळीवर होणाऱ्या अवैध खडी आणि काळ्या दगडांच्या वाहतुकीवर महसूल विभाग मेहेरबान का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात १० चाकी वाहनांतून मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांची वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे ही वाहतूक तहसील कार्यालयासमोरूनच दिवसरात्र सुरू असते.

दहा दिवसांपूर्वी खडीच्या एका डंपरवर कारवाई झाल्यानंतर, सायंकाळी तहसील कार्यालयात गौण खनिज व्यावसायिकांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर स्थानिक दगड वाहतुकीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

महसूल विभागाचे भरारी पथक तैनात असल्याचे तहसीलदार राहुल गुरव सांगत असले, तरी हे पथक केवळ रात्रीच्या वेळी वाळूवरच कारवाई का करते? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

त्या बैठकीत नेमके काय घडले आणि स्थानिक अवैध वाहतुकीला ‘अभय’ कुणाचे, या चर्चांना आता दोडामार्गात उधाण आले आहे.