मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील फिजिओथेरपी (बीपीटीएच) अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थिनीला मोठा दिलासा दिला आहे. NEET-UG 2025 प्रवेश प्रक्रियेतील चुकांमुळे संधी गमावलेल्या विद्यार्थिनीला स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड II साठी अर्ज करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य सीईटी सेलला विद्यार्थिनीची नोंदणी करून पसंती फॉर्म स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. ही परवानगी केवळ जागा रिक्त राहिल्यास लागू राहणार आहे. या निर्णयामुळे अशा परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा न्यायालयीन आधार मिळाला आहे.
नोंदणीतील चुकांमुळे प्रवेश गमावण्याची वेळ
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सीईटी सेलला फिजिओथेरपी (बीपीटीएच) पदवी अभ्यासक्रमाच्या इच्छुक विद्यार्थिनीला NEET-UG 2025 च्या ऑनलाइन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड II साठी अर्ज सादर करण्याची विशेष परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. ही परवानगी केवळ जागा रिक्त राहिल्यास लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अश्विन डी. भोबे यांच्या खंडपीठाने उमेदवाराची नोंदणी करून पसंती फॉर्ममध्ये तिच्या कॉलेजची निवड करण्यास अनुमती देण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने नमूद केले की स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड II साठी नोंदणीची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2025 होती, जी आता संपली आहे. या फेरीचा निकाल 20 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे. संबंधित विद्यार्थिनीने SSC परीक्षेत 95.8% तर HSC परीक्षेत 78.5% गुण मिळवले असून 14 जून रोजी झालेल्या NEET-UG 2025 परीक्षेत ती सामान्य-EWS गुणवत्ता श्रेणीत पात्र ठरली आहे.
हायकोर्टाचा मानवी दृष्टीकोन
विद्यार्थिनींच्या वकील पूजा थोरात यांनी प्रहार डिजिटलला सांगितले की ही विद्यार्थिनी अल्पसंख्याक आणि कमी उत्पन्न गटातील आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान तिने कॉलेज कोड भरताना चूक केली. 6174 ऐवजी 6104 हा कोड भरल्याने तिला सातारा जिल्ह्यातील अधिक फी असलेले कॉलेज वाटप झाले आणि नियमांनुसार तिला पुढील फेरीत अपात्र ठरवण्यात आले.
विद्यार्थिनीने सीईटी सेलला पुढील किंवा भटक्या रिक्त जागांच्या फेरीत सहभागी होण्याची विनंती केली होती. मात्र उत्तर न मिळाल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. न्यायालयाने यापूर्वी 28 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या समन्वय खंडपीठाच्या आदेशाचा आधार घेत राज्य सीईटी सेलला विद्यार्थिनीची नोंदणी स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.












