शिक्षण हे स्वयंसिद्ध होण्याचे साधन : ॲड. प्रकाश जाधव

कर्ले महाविद्यालयाच्या ओंबळ येथील निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

 

शिरगाव (प्रतिनिधी)     श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची रुजवात होईल. शिक्षण हे स्वयंसिद्ध होण्याचे साधन असून विद्यार्थ्यांनी केवळ गुणात्मक नव्हे तर दर्जात्मक शिक्षण घ्यावे, असे मार्गदर्शन शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ॲड. प्रकाश जाधव यांनी ओंबळ येथे केले.

शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर बुधवारी सुरू झाले. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिरार्थींशी संवाद साधताना ॲड. जाधव बोलत होते.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले की, ग्रामविकास हा अर्थकारणाचा कणा आहे. या शिबिरातून ग्रामस्थांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून शिबिरार्थींनी केलेले कार्य सर्वांसाठी आदर्शवत ठरेल.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास गावातील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

निवासी शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास सरपंच अरुण पवार, उद्योजक नितीन पवार, सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्यामसुंदर जाधव, देवस्थान समिती अध्यक्ष राजनकुमार कदम,शिरगांवचे ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, पोलीस पाटील संजय पवार, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, सदस्य दिनेश साटम, मंगेश लोके, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, ओंबळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका कोमल पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य समीर तारी यांनी केले. सूत्रसंचालन ॲकॅडमिक कोऑर्डिनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांनी मानले.