नेमळे ज्युनियर कॉलेजच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

​सावंतवाडी : जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित ज्युनियर ॲथलेटिक्स मीटमध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विद्यालयातील तीन खेळाडूंची डेरवण (रत्नागिरी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​या स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दाजी कापडी हिने अप्रतिम कामगिरी करत १००० मीटर धावणे आणि लांबउडी अशा दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून दुहेरी यश मिळवले. याच गटात प्राची दत्ताराम राऊळ हिने गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात ऋतुराज राजन वराडकर याने भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले, तर सोहम राजन मडवळ याने भालाफेक स्पर्धेतच तृतीय क्रमांक प्राप्त केला.

​राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या तिन्ही खेळाडूंचे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य आर. के. राठोड, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना पांडुरंग दळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच पालक दाजी कापडी आणि राजन मडवळ यांचे विशेष सहकार्य लाभले.