चिपळुणात सात प्रभागात चार फेरीत तर सहा प्रभागांमध्ये तीन फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांची माहिती

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण नगरपरिषद् सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रिया मार्कडी येथील युनायटेड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. सात प्रभागांत चार फेरीत तर सहा प्रभागांमध्ये तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दीड ते दोन तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
१४ प्रभागांकरिता २८ नगरसेवकांची नियुक्ती या निवडणुकीतून केली जाणार आहे. नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार आहे. यासाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. इव्हिएम मशिन युनायटेड इंग्लिश स्कूल येथील स्टॉक रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याची मतमोजणी रविवारी २१ रोजी संपन्न होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल लावले जाणार आहेत. प्रभाग क्रमांकानुसार प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल लावला जाईल. त्या-त्या प्रभागाच्या टेबलवर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतांची मोजणी देखिल केली जाणार आहे. ज्या प्रभागांमध्ये दोन मतदान केंद्र आहेत. अशा प्रभागांमध्ये दोन फेरीत मतमोजणी केली जाईल, असे लिगाडे यांनी सांगितले. सहा प्रभागांमध्ये तीन मतदान केंद्र आहेत. या प्रभागांची मतमोजणी तीन फेऱ्यांमध्ये होणार तर सात प्रभागांमध्ये चार मतदान केंद्र असून या प्रभागांची मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. प्रत्येक फेरीला २० मिनिटांचा कालावधी लागेल. ज्या ठिकाणी दोन फेऱ्या होतील त्याठिकाणी ४० मिनिटांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या ठिकाणी ३ मतदान केंद्र आहेत. त्याठिकाणी ६० ते ७० मिनिटांत तर ज्या ठिकाणी ४ मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणची मतमोजणी ८० ते ९० मिनिटांत पूर्ण होईल. उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना देखिल प्रवेश दिला जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी प्रत्येक टेबलवर ४-कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक तसेच शिपाई आणि कोतवाल यांचा समावेश आहे. ७ टेबलसाठी अधिकाऱ्यांची निवड देखिल करण्यात आली आहे. याबरोबरच मॅन्युअल टीम, एक्सेल टीम, ऑनलाईन टीम देखिल नेमण्यात आली आहे. एकूण १०० कर्मचाऱ्यांची निवड या प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. तब्बल दिड ते दोन तासात सर्व प्रक्रिया पार पडेल, अशी माहितीही लिगाडे यांनी दिली.
चौकट-
बहादुरशेख नाका ते चिंचनाका रस्ता राहणार बंद
यादिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहादुरशेख नाका ते चिंचनाका आणि चिंचनाका ते बहादुरशेख नाका हा मार्ग सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बंद करण्यात आलेल्या मार्गासाठी बहादुरशेख नाका-पॉवर हाऊस-चिंचनाका तसेच चिंचनाका-पावर हाऊस – बहादुरशेख नाका हे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत.