चिपळूण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : राज्याचे मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २८ रोजी चिपळूण येथील राधाताई लाड सभागृह येथे पार पडले.
या शिबिरामध्ये अनेक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये वन विभाग व सामाजिक वनीकरण चिपळूण यांचेमार्फत रोपे वाटप, कामगार विभागामार्फत कामगार ओळखपत्र वाटप, महिला व बाल विकास विभाग मार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, मातृ वंदन योजना, बेबी केअर किट, बाल संगोपन योजना माहिती, तहसिलदार कार्यालयामार्फत संजय गांधी योजना, श्रावणबाळ, पुरवठा विभाग शिधापत्रिकेवरील कमी नाव करणे, नाव वाढविणे, नवीन अंत्योदय शिधापत्रिका वाटप, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, विविध प्रकारचे दाखले तसेच सातबारा, आठ-अ, फेरफार, भूमि अभिलेख विभागामार्फत गट नकाशा, मालमत्ता कार्ड, सनद वाटप, त्यानंतर नगर परिषद चिपळूण मार्फत जन्म व मृत्यु दाखले, बचत गट बँक लिंकेज योजना, पी.स्व.निधी योजना, असेंसमेंट उतारा या सेवा, आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, वय वंदन कार्ड, आरोग्य तपासणी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दुधाळ जनावरे वाटप, कृषि विभागामार्फत पीएम किसान लाभार्थी, जिल्हा उद्योग केंद्र यांचेमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती मंजूर पत्र, पंचायत समिती मार्फत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थी यांना चाव्यांचे वाटप करण्यात आले. जन्म व मृत्यु दाखले वाटप करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा सैनिक कार्यालय रत्नागिरी, पोलीस विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, महावितरण यांचेमार्फत त्यांचेकडील असलेल्या विविध योजनाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
या शिबीर अभियान अंतर्गत राज्य शासकीय योजना लाभ ४१८ लाभार्थी यांनी घेतला. केंद्र शासकीय योजनांचा लाभ ९२१, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शासकिय योजनांचा लाभ ३७७ आणि याव्यतिरिक्त लाभ घेणारे १२७१ इत्यादी यांनी लाभ घेतला. या शिबिरात एकूण २ हजार ९८८ प्रकारच्या सेवा लाभार्थी यांना देण्यात आल्या. त्यामुळे हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरले आहे. सदर शिबिरास सभापती सुर्यकांत नारायण खेतले, संगमेश्वर पंचायत समिती सभापती श्रीम. शर्वरी प्रथमेश वेल्ये, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य चिपळूण /संगमेश्वर तसेच चिपळूण नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ, व नगर सेवक नगर परिषद चिपळूण, उपविभागीय अधिकारी चिपळूण आकाश लिगाडे, तहसिलदार चिपळूण प्रवीण लोकरे, तहसिलदार संगमेश्वर व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.