माजी सभापती अशोक बागवे यांची विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे मागणी
विभाग नियंत्रक यांचे विभाग वाहतूक अधिकारी यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
आचरा-देवगड आगारातून कुडाळ आगारात जाणारी तसेच आचरा येथून भगवंतगडला जाणारी एसटी बसफेरी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी माजी सभापती अशोक बागवे यांनी विभाग नियंत्रक कणकवली प्रदीप घोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी केली आहे.
देवगड आगारातून सकाळी ७.३० वाजता सुटून कुडाळ आगारात जाणारी एसटी बस तसेच रात्री कुडोपी येथे मुक्कामी असणारी आणि सकाळी ७ वाजता आचरा येथून चिंदर पालकरवाडी, भटवाडी, लब्देवाडीमार्गे भगवंतगडला जाणारी एसटी बस या दोन्ही फेऱ्या शालेय फेऱ्या म्हणून चालविल्या जातात. त्यामुळे शाळांना सुट्टी असलेल्या दिवशी या फेऱ्या बंद ठेवण्यात येतात.
या बसफेऱ्यांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने सुट्टीच्या दिवशी बस बंद राहिल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या दोन्ही बसफेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवगड-कुडाळ बसफेरीसाठी माजी सभापती अशोक बागवे यांचे तर भगवंतगड बसफेरीसाठी चिंदर ग्रामपंचायतीचे निवेदन देण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक घोडे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विभाग नियंत्रकांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत विभाग वाहतूक अधिकारी देशमुख यांना पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले.
या कामी उद्योजक प्रकाश मेस्त्री, अनिल सावंत, चिंदर ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायत वरिष्ठ कर्मचारी विश्राम माळगांवकर यांचे सहकार्य लाभले.













