ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात भव्य ‘फ्लोट’ शोभायात्रा

सावंतवाडी | प्रतिनिधी : सरते वर्ष २०२५ ला निरोप देऊन नववर्ष २०२६ चे स्वागत आणि ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण ‘ख्रिसमस’च्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात रविवारी भव्य ‘फ्लोट’ शोभायात्रा काढण्यात आली. सावंतवाडी कॅथोलिक असोसिएशनच्या वतीने आयोजित या शोभायात्रेने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले होते. सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


​प्रबोधनात्मक देखावे आणि भव्य रथ
मिाग्रीस हायस्कूलच्या प्रांगणातून या शोभायात्रेला उत्साहात सुरुवात झाली. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे शहरातील युवकांनी अत्यंत कल्पकतेने साकारलेला भव्यदिव्य ‘ख्रिसमस रथ’. यासोबतच येशू ख्रिस्तांनी दिलेला सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे विविध चित्ररथ आणि सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपारिक वेशभूषा आणि ‘मेरी ख्रिसमस’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते.


​सेल्फीचा आनंद आणि मोठी गर्दी
शोभायात्रेत सहभागी झालेल्या सांताक्लॉजने बच्चेकंपनीसह मोठ्यांचेही मनोरंजन केले. सांतासोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. मोती तलावाच्या काठी ही शोभायात्रा पोहोचली असता, ती पाहण्यासाठी पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण मार्गावर ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना आणि शहरवासीयांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरु (फादर), सिस्टर्स यांच्यासह फा. मिलेट डिसोजा, जॉय डॉन्टस, जेम्स बोर्जीस, रेमी आल्मेडा, आगस्तीन फर्नांडिस, रुजाय रॉड्रीक्स, फ्रान्सिस डिसोझा, मायकल आल्मेडा, क्लॅटस फर्नांडिस, बाबा आल्मेडा यांसह समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्वधर्मसमभावाचे दर्शन
सावंतवाडीच्या या शोभायात्रेत केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे, तर सर्व धर्मीय नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या माध्यमातून शहरात पुन्हा एकदा सर्वधर्मसमभावाचे आणि एकोप्याचे दर्शन घडले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रॅलीने नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित केला.