चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा दणदणीत विजय

नगराध्यक्षपदी उमेश सकपाळ
माजी नगरसेवकांचा पराभव तर नव्या चेहऱ्यांना संधी
रमेश कदम यांना बसला महाविकास आघाडीच्या बिघाडीचा फटका

चिपळूण (संतोष सावर्डेकर) : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या चिपळूण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेश धोंडीराम सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवत चिपळूणच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. शिवसेना (शिंदे गट)- ९, भाजप -७, युतीने १६ जागा जिंकत चिपळूण नगर परिषदेवर प्राबल्य सिद्ध केले आहे. तर शिवसेना उबाठा ५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रत्येकी दोन जागा तर काँग्रेसने ३ जागा जिंकून यश संपादन केले आहे. युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांच्यासह युतीच्या उमेदवारांनी विजय मिळवताच युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर या निवडणुकीत मतदारांनी माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवत तरूणांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपचे संदीप भिसे यांनी अवघ्या १ मतांनी आघाडी घेत विजयाची मोहर उमटवली आहे. यामुळे सुनील रेडीज यांना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीतील आकडेवारी पाहता युतीच्या उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. तर महाविकास आघाडीत फुट पडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सात तर नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी ११० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. शहरातील ४८ मतदान केंद्रावरील ४२ हजार ५८२ मतदारांपैकी २७ हजार ३१७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १३ हजार ४३९ पुरूष तर १३ हजार ८७८ महिला मतदारांनी मतदान केले. तब्बल १९ दिवसांनंतर युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात मतमोजणी झाली. यावेळी नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीवेळी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी पहिल्या फेरीत ३५ मतांची आघाडी मिळवत शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांना शेवटपर्यंत आघाडी मिळाली नाही. अखेर उमेश सकपाळ यांनी ११ हजार ७३९ मते मिळवत रमेश कदम यांचा १२८१ मतांनी पराभव केला. कदम यांना १० हजार ४५८ मते मिळाली. तर शिवसेना उबाठाचे राजेश देवळेकर १६१०, मोईन पेचकर यांना २४८, निशिकांत भोजने २१७, लियाकत शाह १६३२, सुधीर शिंदे १०४८ तर नोटा ३६५ मते मिळाली आहेत. मतांची ही आकडेवारी पाहता महाविकास आघाडीच्या बिघाडीचा फटका रमेश कदमांना बसला आहे.

भाजप, शिवसेना युतीच्या नेतृत्वांचा करिष्मा

भाजपने या निवडणुकीत आपला करिष्मा दाखवत चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीची संयोजक पदाची जबाबदारी असलेले भाजप नेते प्रशांत यादव यांनी आपले नेतृत्व या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध केले आहे. भाजपचे ७ उमेदवार विजयी झाले असून यामध्ये शशिकांत मोदी, संदीप भिसे, रसिका देवळेकर, वैशाली निमकर, अंजली कदम, रूपाली दांडेकर, शुभम पिसे हे विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी नेतृत्व केले होते. शिवसेना-भाजप युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी विजय मिळवलाच, शिवाय शिवसेना शिंदे गटाचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये उदय जुवळे, प्रमोद बुरटे, निहार कोवळे, हर्षाली पवार, विक्रांत शिर्के, अंकुश आवले, गणेश आग्रे, पल्लवी महाडिक, निलम जाधव तर कॉग्रेसच्या तीन उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये मिसबाह नाखुदा, सफा गोठे, साजिद सरगुरोह यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी नेतृत्व केले होते.

काँग्रेसचे ३ तर दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन, शिवसेना उबाठाचे ५ उमेदवार विजयी

निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसकडून नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार असलेले लियाकत शाह यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिले. शाह यांच्याबरोबर सोबत असलेले नगरसेवक पदाचे उमेदवार यांना विजयाची हुलकावणी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्या उमा देसाई, नसरीन खडस, राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून योगेश पवार, शैनाज वांगडे तर शिवसेना उबाठाचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये अजय भालेकर, कांचन शिंदे, मिथिलेश नरळकर, संजय गोताड, वैशाली कदम यांचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदारांनी अपक्षांना सपशेल नाकारले आहे.

मतदारांनी माजी नगरसेवकांना बसवले घरी

चिपळूणच्या मतदारांनी माजी नगरसेवकांना नाकारले असून नव्या दमाच्या तरूणांना नगरपरिषदेवर पाठवले आहे. माजी नगरसेवक किशोर रेडीज, सुरैय्या फकीर, आशिष खातू, रूक्सार अलवी, कबीर काद्री, राजेश केळसकर, नुपुर बाचिम, सुधीर शिंदे, मोहन मिरगल, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत भोजने, लियाकत शाह, रमेश कदम यांनादेखीला मतदारांनी नाकारले आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

तर नगरपरिषदेवर बऱ्याचअंशी नवीन चेहरे निवडून गेले आहेत. यामध्ये मिसबाह नाखुदा, उदय जुवळे, साजिद सरगुरोह, रूपाली दांडेकर, प्रमोद बुरटे, अजय भालेकर, निहार कोवळे, नसरीन खडस, वैशाली निमकर, संजय गोताड, संदीप भिसे, हर्षाली पवार, शैनाज वांगडे, योगेश पवार, अंजली कदम, विक्रांत शिर्के, अंकुश आवले, निलम जाधव, उमा देसाई, वैशाली कदम, शुभम पिसे, गणेश आग्रे, अजय भालेकर, पल्लवी महाडिक, कांचन शिंदे, मिथिलेश नरळकर यांचा समावेश आहे.

तीन माजी नगरसेवकांना पुन्हा संधी

चिपळूणच्या मतदारांनी काही माजी नरसेवकांना घरचा रस्ता दाखवला असला तरी काहींना पुन्हा स्विकारले आहे. यामध्ये कॉग्रेसच्या सफा गोठे, भाजपचे शशिकांत मोदी, रसिका देवळेकर या तीन चेहऱ्यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार उमेश सकपाळ यांनी यापूर्वी नगरसेवक पद भूषवले आहे.

भाजपचे संदीप भिसे अवघ्या १ मताची आघाडी घेत विजयी

भाजपचे तरूण पदाधिकारी संदीप भिसे यांनी पक्षाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सुनील रेडीज यांनी कडवी लढत दिली. मात्र, भिसे यांनी रेडीज यांचा अवघ्या एका मताने पराभव करीत विजयाची मोहर उमटवली आहे.

कदम-जाधवांचा करिष्मा चालला नाही

चिपळूण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कट्टक विरोधक असलेले शिवसेना उबाठाचे नेते आ. भास्कर जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम प्रथमच एकत्र आल्याचे पहावयास मिळाले. तर शिवसेना उबाठाचे सचिव विनायक राऊत यांनी पक्षाकडून राजू देवळेकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. तसेच नगरसेवक पदासाठी देखील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. तर दुसरीकडे आ. भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांच्यासह आपल्या काही पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. यामुळे शिवसेना उबाठात दुफळी झाल्याचे समोर आले. रमेश कदम निवडून येतील असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. मात्र, तो फोल ठरला आहे. तसेच या निवडणुकीत कदम-जाधवांचा करिष्मा चालला नसल्याचे समोर आले आहे. मात्र, जाधव राहत असलेल्या प्रभागातील दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये मुलगी सौ. कांचन शिंदे व मिथिलेश नरळकर यांचा समावेश आहे.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत

निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांनी सहाय्य केले. गुरूदक्षिणा सभागृहात १४ टेबलांवर ४ फेऱ्यात मतमोजणी झाली. दरम्यान मतमोजणीवेळी तीन उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी मागणी केली. यामध्ये सुनील रेडीज, रूही खेडेकर, विष्णू लाणे या तीन उमेदवारांचा समावेश आहे. मतमोजणीवेळी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती तर १५० पोलीस कर्मचारी तैनात होते. मतमोजणी प्रक्रियेवेळी चिंचनाका ते बहादूरशेखनाका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. निवडणुकीचा निकाला लागताच विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळत मिरवणुकीने जल्लोष केला. अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी यांनी मतमोजणी केंद्राला भेट देत पाहणी केली.

चिपळूण नगर परिषद

विजयी उमेदवार

नगराध्यक्ष – उमेश धोंडीराम सकपाळ – शिवसेना ११७३९

नगरसेवक

मिस्बाह असगर नाखुदा- कॉंग्रेस ११६३

उदय विठ्ठल जुवळे शिवसेना- ८४३

सफा दिलबर गोठे कॉंग्रेस- ८३१

साजिद हनीफखान सरगुरोह – कॉंग्रेस ६२९

रूपाली राकेश दांडेकर – भाजपा ६५२

प्रमोद सुभाष बुरटे – शिवसेना ८६७

अजय पांडुरंग भालेकर- शिवसेना उबाठा १२९२

वैशाली विलास कदम- शिवसेना उबाठा ११९६

निहार हेमंत कोवळे – शिवसेना ११७४

नसरीन मुश्ताक खडस- राष्ट्र (श.प.) १०६४

वैशाली मधुकर निमकर- भाजपा ७०९

संजय चंद्रकांत गोताड- शिवसेना उबाठा ४६१

संदीप अशोक भिसे – भाजपा ४१८

हर्षाली संदेश पवार – शिवसेना ६९८

शेनाज नजीर वांगडे- राष्ट्र (अ.प.) ७५९

योगेश जगन्नाथ पवार- राष्ट्र (अ.प.) ९७९

अंजली सतीश कदम – भाजपा ६३२

शशिकांत श्रीकांत मोदी- भाजपा ८७९

रसिका रत्नदीप देवळेकर – भाजपा ५२४

विक्रांत विठ्ठल शिर्के – शिवसेना ८९२

निलम सिताराम जाधव- शिवसेना ६९२

अंकुश अशोक आवले- शिवसेना ११६८

उमा उदय देसाई – राष्ट्र (श.प.) ५०३

शुभम दयानंद पिसे- भाजपा ६६१

गणेश सुरेश आग्रे – शिवसेना १०७६

पल्लवी मोहन महाडिक- शिवसेना ११६०

कांचन सुमित शिंदे – शिवसेना उबाठा १०१६

मिथिलेश मनोहर नरळकर- शिवसेना उबाठा