देवरूख नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता; महाविकास आघाडीला केले धोबीपछाड

नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये
महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतीषबाजी करत, गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा

निलेश जाधव / देवरूख

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये या विजयी झाल्या आहेत. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी करत, गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला.

नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी १० वा. सुरूवात झाल्यानंतर पहिल्यांदा प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. ९ ची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्र. १० ते प्रभाग क्र. १७ ची मतमोजणी करण्यात आली. यानंतर नगराध्यक्षपदाची मतमोजणी झाली. साधारणपणे दोन तासात संपूर्ण निकाल जाहीर झाला. जसजसे उमेदवार विजयी होत होते. तस तसे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते. प्रचारात सातत्य असल्याने आणि महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिल्याने महायुतीला विजय मिळवता आला. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही चांगली लढत दिली. चार अपक्ष उमेदवारांनी जिंकून येण्याचा करीष्मा केला आहे. त्यामुळे या अपक्ष उमेदवारांचाच देवरूख शहरात बोलबोला होता. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षा होण्याच्या मान मिळवला.

या निवडणुकीत महायुती १०, महाविकास आघाडी ३ आणि अपक्ष ४ असे मिळून १७ उमेदवार विजयी झाले. यात भाजप ३, शिवसेना शिंदे गट ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४, शिवसेना ठाकरे गट ३ आणि अपक्ष ४ असे पक्षनिहाय उमेदवार विजयी झाले. एकूण संख्याबळाचा विचार करता महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीचा विजय होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महायुतीचा विजय असो.. अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. एकंदरीत महायुतीच्या दणदणीत विजयनंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पहावयास मिळाले. प्रत्येकजण आनंदाच्या भरात जल्लोष करत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी केली. तसेच एकमेकांवर गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला.

प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-

प्रभाग क्र. १ समृद्धी वेलवणकर (भाजप), प्रभाग क्र. २ यशवंत गोपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), प्रभाग क्र. ३ दिपक गेल्ये (शिवसेना शिंदे गट), प्रभाग क्र. ४ वैभव पवार (शिवसेना शिंदे गट), प्रभाग क्र. ५ स्वाती राजवाडे (भाजप), प्रभाग क्र. ६ प्राची भुवड (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), प्रभाग क्र. ७ श्रद्धा इंदुलकर (भाजप), प्रभाग क्र. ८ सिद्धेश वेल्हाळ (अपक्ष), प्रभाग क्र. ९ कविता नार्वेकर (अपक्ष), प्रभाग क्र. १० अक्षय झेपले (अपक्ष), प्रभाग क्र. ११ अनुराग कोचिरकर (अपक्ष), प्रभाग क्र. १२ बाळा कामेरकर (शिवसेना ठाकरे गट), प्रभाग क्र १३ रितिका कदम (शिवसेना ठाकरे गट), प्रभाग क्र. १४ नेहा आंबेकर (शिवसेना शिंदे गट), प्रभाग क्र. १५ निधा कापडी (शिवसेना ठाकरे गट), प्रभाग क्र. १६ दिपक खेडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) आणि प्रभाग क्र. १७ रुपाली बेंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) दरम्यान, महायुतीच्या या विजयामुळे देवरूख शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून नव्या नगराध्यक्ष व नगरसेवकांसमोर पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा या प्रमुख प्रश्नांवर प्रभावी कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.