खेड (प्रतिनिधी) : थोर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून JCI खेड आणि ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय गणित प्रदर्शन व भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव माध्यमिक विभाग आणि कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेत उत्साहात पार पडले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. प्रताप सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त भालचंद्र कांबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख विठ्ठल सकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
या गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विविध गणितीय प्रतिकृती आणि भित्तीपत्रके सादर करण्यात आली. प्रदर्शनामध्ये एकूण ७० प्रतिकृती आणि ३० भित्तीपत्रकांचा समावेश होता. खेड तालुक्यातील एकूण १० शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण सुर्वे क्लासेस, निजामपूरचे मनोज सुर्वे सर, गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण यांच्या प्रतिभा पाटील मॅडम आणि ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल, बोरजच्या स्नेहलता खोपडे मॅडम यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. प्रताप सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजून घेण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी सर्व प्रतिकृती व भित्तीपत्रके पाहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
या प्रदर्शनात प्रथम क्रमांक एस. एम. इंग्लिश स्कूल, खेडच्या सबा इम्रान चौगले आणि सफा रिझवान परकार यांच्या ‘Pascal Triangle’ या प्रतिकृतीने पटकावला. द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल, दयाळच्या अनज्ञा सुनील झुजम आणि आर्या मनोहर चव्हाण यांच्या ‘Trigonometric Function Cycle’ या प्रतिकृतीला मिळाला. तृतीय क्रमांक विभागून रोटरी इंग्लिश स्कूलच्या हर्षित संदीप कोहापरे व आयुष अशोक मळेकर यांच्या ‘Trigonometric Ratios’ तसेच ज्ञानदीप भडगावच्या तेज राजेश भागणे व ओजस सतिश साठे यांच्या ‘Algebraic Identities’ या प्रतिकृतींना देण्यात आला.
हे गणित प्रदर्शन विभाग प्रमुख व गणित शिक्षक विठ्ठल सकुंडे, कांतिनाथ शिंदे आणि संदेश जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तसेच JCI खेडचे अमित नामुष्ट्ये, मधुर पेठे, प्रमोद कांबळे यांच्या विशेष सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ सदस्य आणि ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
एकूणच हा तालुकास्तरीय गणित प्रदर्शन उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणारा, त्यांच्या कल्पकतेला वाव देणारा आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या विचारांना उजाळा देणारा ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.












