प्रचंड आवाजाचा ‘तो’ कॉम्प्रेसर महानगर गॅस महिनाभरात हलवणार

नगरसेविका अंजली कदम, शशिकांत मोदी यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण (प्रतिनिधी) : गेली काही वर्ष महानगर गॅसचा एका कॉम्प्रेसरमुळे प्रथमेश अपार्टमेंट मधील नागरिकांना आवाजाच्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत आहे. मात्र आता महिनाभरात सदरचा मोठा आवाज करणारा कॉम्प्रेसर हलवणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करताना नगरसेविका अंजली कदम, मुख्याधिकारी संजय जाधव आणि पत्रकार सतीश कदम यांच्याशी चर्चा करताना हा कॉम्प्रेसर आता हलवण्यात येणाऱ्या असल्याचे निश्चित झाले आहे.
या कॉम्प्रेसरच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक खूपच त्रस्त झाले होते या संदर्भात प्रभाग नऊच्या नगरसेविका अंजली कदम तसेच नगरसेवक शशिकांत मोदी यांनी वारंवार महानगर गॅसचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या तसेच पत्रव्यवहार करून याबाबत मागणी ही केली होती तीन ते चार महिन्यापूर्वी दोनवेळा नागरिकांना घेऊन महानगर गॅसच्या परिसरामध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर काहीकाळ रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा कॉम्प्रेसर बंद ठेवण्यात आला होता, परंतु पुन्हा हा कॉम्प्रेसर सुरू केल्याने नागरिक ही संतप्त झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ही झटकून टाकली होती.
दरम्यान, चार दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उद्योगमंत्री उदय सामंत हे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला आले असताना नगरसेविका अंजली कदम यांनी सदरच्या कॉम्प्रेसरच्या त्रासाबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर तातडीने नामदार सामंत यांनी याची दखल घेऊन गेल्या रविवारी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी यांनी पंधरा दिवसाची मुदत देऊन याबाबत ताबडतोब कार्यवाही करावी असे आदेश दिले. या संदर्भात महानगरगॅसचे अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी संजय जाधव तसेच वैभव निवाते यांचेसह नगरसेविका अंजली कदम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काही सूचना दिल्या. नवीन कॉम्प्रेसर हे अत्याधुनिक बनवण्याचे असून त्यामध्ये आवाजाचे प्रमाण अत्यल्प आहे व जुना कॉम्प्रेसर ताबडतोब महिनाभरात हलवणार असल्याची हमी सदर महानगर गॅसचे अधिकाऱ्याने दिली. यासंदर्भात तांत्रिक टीमची बैठक घेऊन याबाबतचा कालावधी कळवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र नवीन बांधकाम केलेल्या जागी बसवण्यात आलेल्या कॉम्प्रेसरचा आवाजाची जर पुन्हा समस्या तयार झाली तर महानगर गॅस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा काढू असाही इशारा यावेळी देण्यात आला.