दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा शशांक घाग यांची खेडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांना सदिच्छा भेट

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत २१–० असा एकहाती विजय मिळवला. या ऐतिहासिक निकालानंतर दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा शशांक घाग यांनी खास दापोलीहून खेड येथे येऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान सौ. कृपा घाग यांनी खेड नगरपालिकेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचेही अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. खेडच्या जनतेने दिलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि हा विजय विकासाभिमुख कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी दापोली नगरपंचायतीतील नगरसेवक तसेच दापोली तालुका शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. सर्वांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान परस्पर सहकार्याने दोन्ही शहरांच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांनी सौ. कृपा घाग व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानत खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. या सदिच्छा भेटीमुळे नवनिर्वाचित प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात खेडच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.