खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून नवबौद्ध वाडी, लवेल येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
अभियानाची सुरुवात गावातील बुद्धविहार येथे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ एकत्र येऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व आणि समाजातील समतेच्या दृष्टीने अशा उपक्रमांची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे चार गट तयार करून त्यांना गावातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहिमेसाठी पाठविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी पुन्हा बुद्धविहार येथे एकत्र आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमाला गावातील प्रशांत गमरे, केशव गमरे, शंकर तांबे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील प्रा. व्ही. डी. कांबळे, प्रा. विनायक माळी, श्री. सुनील जोशी व श्री. संदेश निकम यांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील आणि रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या स्वच्छता अभियानातून विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा आदर्श ठेवत सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे दिला.








