गुहागर नगरपंचायत निवडणूकित युतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना डॉ. नातूंचा इशारा
गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर नगरपंचायत निवडणूकित भाजप-शिवसेना युतीने भरघोस यश मिळवून आपली सत्ता आणली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे दोन व भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार पराभूत झाले हा पराभव विचार करावा लागणार आहे. युतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांमुळे हा पराभव झाला असून चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई न केल्यास पुढील काळात युती टिकवणे अवघड होईल याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. असा इशारा माजी आम. डॉ.विनय नातू यांनी दिला आहे.
गुहागर नगरपंचायतीत युतीचा झेंडा फडकवण्यात व भाजपचा ऐतिहासिक विजय संपादन करून नगराध्यक्ष निवडून आणण्यात डॉ. विनय नातू यांची महत्त्वाची भूमिका ठरली होती.मात्र या निवडणुकीत युती असतानाही बेबनाव झाल्याने डॉ.नातू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले की, गुहागर नगरपंचायत निवडणूक शिवसेना व भारतीय जनता पार्टी युतीने एकत्रित लढवली या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दोन व भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार पराभूत झाले हा पराभव सुद्धा विचार करावा लागणारा आहे पण असे होत असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी युती असताना शिवसेनेच्या उमेदवाराचा मुलगा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभा होता हे सर्व युतीच्या संकेताला धरून नव्हते व युतीची नियमावली तुडवून होत असणारे काम होते मात्र निवडणूक होईपर्यंत युतीमध्ये बेबनाव होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत युतीच्या वरिष्ठांकडे योग्य प्रकारे निरोप पोहोचवला होता पण यावरील कोणतेच कारवाई झाली नाही व त्या वॉर्डांमध्ये एकमेकाला युतीच्या विरोधात मदत करण्याचे काम झाले हे सर्व युतीच्या संकेता विरोधात आहे या अशा घटनांमुळेच युतीमध्ये बेबना वाढत जातो व युतीतला समन्वय टिकत नाही
त्यांनी पुढे सांगितले की,यातला अनुभव गुहागर मधील सर्व युतीच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी आलेला आहे या युतीच्या काही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्याचे फायदे इतर पक्षातले अनेक जण उठवत असतात याबाबत योग्य वेळी सर्व पदाधिकाऱ्यांना समज देणे गरजेचे आहे अन्यथा या पद्धतीने युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जे कोण आहेत त्या सर्वांना या निर्णयापासून दूर ठेवणे आवश्यक आहे जर योग्य प्रकारे युतीचा समन्वय करण्याची भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवली तरच युतीचे काम समन्वयाने होईल पण या पद्धतीने चुकीचे वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई न केल्यास पुढील काळात युती टिकवणे सुद्धा अवघड होईल याची जाणीव सर्वांनी ठेवण्याचे गरजेचे आहे. याबाबत सर्व अहवाल वरिष्ठांकडे पाठवून देण्यात आलेला आहे युतीचे जिल्हा पातळीवरील व महाराष्ट्र पातळीवरील सर्व नेते याबाबत योग्य विचार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.












