णपतीपुळे येथे २४ डिसेंबरपासून ‘जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री’ मेळाव्याचे आयोजन
रत्नागिरी: ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दिनांक २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र गणपतीपुळे (देवस्थान परिसर) येथे ‘जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या प्रदर्शनात एकूण ७५ स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार असून, यामध्ये ६० स्टॉल विविध उत्पादनांचे तर १५ स्टॉल चविष्ट खाद्यपदार्थांचे (फूड स्टॉल) असतील. या प्रदर्शनात जिल्ह्यातील १०७ स्वयंसहाय्यता समूह, ४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि १ उद्योग विकास केंद्र सहभागी होणार आहेत. नाताळच्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते, ज्याचा फायदा या महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी होणार आहे.
प्रदर्शनामध्ये ग्रामीण महिलांनी बनवलेल्या हस्तकला वस्तू, जसे की बुरुड काम, गोधडी, लोकर आणि क्रेशियाच्या वस्तू, तसेच शुद्ध घरगुती मसाले, विविध प्रकारची पीठे, पापड, लोणची आणि कोकणी मेवा (काजू, फणसपोळी, आंबापोळी, कोकम सरबत) विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय रोपवाटिकेतील आंबा, काजू आणि नारळाची कलमे देखील माफक दरात मिळतील. प्रदर्शनाच्या कालावधीत दररोज सायंकाळी लोककला, लोकगीते, भारुडे यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभागी महिलांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजनही करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा सांगता समारंभ २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ३:०० वाजता पार पडणार आहे. यावेळी उत्कृष्ट मांडणी आणि सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहाय्यता समूहांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे आणि जिल्हा व्यवस्थापक अमोल काटकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.












