अनेक भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच
पाचल वासीयांना अधिकाऱ्यांना घेराव
शिळ गावात कमी अधिक दाबाने विजपुरवठा
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यात गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच महावितरणच्या अनागोंदी कारभाचा फटका तालुका वासीयांना बसत आहे. पावसाळयापुर्वी करावयाची दुरूस्ती व देखभालीची कामे वेळेत पुर्ण न केल्याने अनेक भागात अंधार पसरला असून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे तालुका वासीयांतुन संताप व्यक्त होत आहे. अशाच महावितरणच्या कारभाराला त्रस्त झालेल्या पाचल वासीयांनी पाचल विभागाच्या अभियंत्यांना घेराव घालुन जाबही विचारला आहे.
मात्र राजापुरात स्वत:ला विकासाचे महामेरू समजणारे लोकप्रतिनिधीना याच काहीच देणं घेणं नसून अधिकारी या लोकप्रतिनिधींना जुमानतच नसल्याची बाब पुढे आली आहे. तर नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष आणि त्यासाठी प्रशासनाने तयार केलेला ग्रुप हा केवळ अमुक भागात आपत्ती घडली एवढयाच माहितीपुरता मर्यादित असून लोकांनी ग्रुपवर केलेल्या तक्रारींबाबत ना निवारण ना आपत्ती प्रमुखांकडून कुठले उत्तर अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
जून महिना काहीसा कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सोमवार 17 जुलै पासून तर मुसळधार स्वरूपात पाऊस पडत आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठीकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर अर्जुना व कोदवली नद्यांसह ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे.
या अनेक समस्यांमुळे त्रस्त असलेल्या जनतेच्या त्रासात महावितरणच्या अनागोंदी कारभाराची भर पडली आहे. शहरासह अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला झाला आहे. तर काही भागात वारंवार कमी अधिक दाबाने विजपुरवठा होत असून त्यामुळे विज उपकरणे निकामी ठरत आहेत. उन्हाळयात दर सोमवारी देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली महावितरणकडून तालुक्यातील विजपुरवठा बंद ठेवला जात होता. मात्र प्रत्यक्षात पावसाळयात आता एकूणच विजपुरवठयाचा झालेला खेळखंडोबा पाहिल्यावर पावसाळयापुर्वी करावयाची देखभाल दुरूस्तीची कामे महावितरणकडून योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याची बाब उघड झाली आहे.
राजापूर भाग एकचे उपकार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन अधिकारी रूजू झाले आहेत. मात्र त्यांना तालुक्याची व त्यांच्याकडे असलेल्या कार्यक्षेत्राची अद्याप माहितीच नसल्याने ते ग्राहकांना काहीच उत्तर देत नाहीत, तुमच्या वायरमनला संपर्क साधा असे ते सांगतात. तर शहर शाखा अभियंता चिन्मय चिवटे यांची बदली झाल्यानंतर या पदावर अद्याप कोणीही अधिकारी नियुक्त नाही. त्यामुळे शहर वासीयांचीही गैरसोय होत आहे.
महावितरणचे कर्मचारी भर पावसातही काम करून विजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करताना काही ठीकाणी पहावयास मिळत आहे. मात्र अधिकारी निवांत असून त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काही देणं घेण नाही अशी अवस्था आहे.
पाचल विभागात तर कायमच महावितरण्याच्या कारभाराविरोधात संताप आहे. पाचल आणि पाचल परिसरात गेले तीन चार महिन्यापासून सातत्याने वीजेचा खेळखंडोबा सुरू असून ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पाचल परिसरातील ग्राहकांनी वीजेचा खेळखंडोबा आणि वीजेच्या इतर समस्याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता सकपाळ यांना घेराव घालत जाब विचारला ग्राहकांच्या एकाही प्रश्नांचे उत्तर त्यांना देता आले नाही. येत्या आठ दिवसात सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा व अन्य समस्या मार्गी न लागल्यास पाचल कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या घेराव कार्यक्रमाचे नेतृत्व पाचलचे सरपंच बाबालाल फरास, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरी सरपंच अमर जाधव, महिला कार्यकर्त्या शशिताई देवरूखकर, माजी सरपंच सौ.अपेक्षा मासये, बाबुराव कोलते, पत्रकार तुषार पाचलकर, सुनिल जाधव, मूरचे माजी सरपंच भास्कर सुतार आदी उपस्थित होते.
पाचल परिसरात मागील तीन चार महिन्यापासून सातत्याने वीजेचा लपंडाव सुरु असल्याने ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. व्यापारी, बँका, शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. महावितरणला वारंवार लेखी निवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी अभियंत्याना घेराव घालत याचा जाब विचारला. जीर्ण वीज वाहिन्या व खांब, वाहिन्यावरील झाड झुडपांची सफाई न केल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
मात्र या एकूणच प्रकाराने त्रस्त झालेल्ऱ्या जनतेला मात्र कुणी वालीच नाही अशी राजापूरची अवस्था आहे. विकासाच्या पोकळ बाता मारणारे राजापूरचे लोकप्रतिनिधी यात पुरते अपयशी ठरले आहेत. नव्हे या लोकप्रतिनिधींना अधिकारी जुमानच नसल्याची बाब वारंवार पुढे आली आहे. केवळ आढावा बैठकांचा फार्स करून फोटो सेशन करण्यातच या लोकप्रतिनिधींचे कतृत्व आहे काय असा सवाल आता जनतेतुन उपस्थित केला जात आहे.
शासनाचा गडेलठ्ठ पगार घेणारी महावितरणची हि अधिकारी मंडळी ग्राहकांच्या जीवाशी खेळत असून याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील असा ईशारा ग्राहकांनी दिला आहे.
शीळ परिसरात कमी दाबाने विजपुरवठा
शहरानजीकच्या शिळ गावात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कमी अधीक दाबाने विजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे विजउपकरणे जळून जाण्याची शक्यता असून महावितरण कडून दुर्लक्ष केले जात आहे. कमी अधीक दाबाने होणाऱ्या विजपुरवठयामुळे मोटर पंप, पिठाची गिरणी व विजेवर अवंबलून असणारी साधणे बंद पडली आहेत. त्यामुळे ऐन पावसाळयात पाणी असूनही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना यातायात करावी लागत आहे. गेल्या वर्षभरापासून कमी अधिक दाबाच्या विजपुरवठयाचा सामना येथील ग्राहकांना करावा लागत आहे. मात्र त्यावर तात्पुरती उपाययोजना केली जाते . मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढून कमी अधीक दाबाने होणाऱ्या समस्येचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.










