सोवेली येथील श्री कालभैरव मंदिरात धाडसी चोरी; जुन्या पितळी वस्तूंसह सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास

​रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील श्री कालभैरव मंदिरात चोरीची मोठी घटना घडली आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२५ च्या सायंकाळपासून २५ डिसेंबर २०२५ च्या सायंकाळपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील मौल्यवान वस्तू पळवल्या. चोरट्याने मंदिरातून सुमारे ७० ते ८० वर्षे जुनी आणि १५ किलो वजनाची पितळी घंटा, ३ फूट उंचीचा व १५ किलो वजनाचा पितळी कलश, तसेच ५ वर्षांपूर्वीची एक लहान पितळी घंटा असा एकूण ३०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे, चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्याने मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘इक्विजेन’ कंपनीचा डीव्हीआर आणि हार्डडिस्क देखील सोबत नेली आहे. या प्रकरणी २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.